नाशिक: भंगार गोदामाचे आगीत नुकसान

आगीत एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

झोपडपट्टी, भंगार गोदामांना आग लागण्याचे प्रकार शहरात सुरुच असून जेलरोड परिसरातील जुना सायखेडा रस्त्यावरील भगवती लॉन्सजवळ असलेल्या भंगार, रद्दीच्या दुकान आणि गोदामाला मंगळवारी पहाटे पाच वाजता आग लागली. आगीत एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

भगवती लॉन्सजवळ आयुब रशीद खान (रा. वडाळा गाव) यांच्या मालकीचे भंगार दुकान, गोदाम आहे. गोदामात रद्दी, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या आहेत, आजूबाजूला देखील अनेक दुकाने आहेत. मंगळवारी पहाटे या रस्त्याने फिरण्यासाठी निघालेल्या नागरिकांना दुकानातून धूर येताना दिसला, त्यांनी त्वरीत अग्निशमन दलाला कळविले. नाशिकरोड येथील दोन बंब, क. का. वाघ केंद्र आणि मुख्यालयातील असे प्रत्येकी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांहून अधिक काळ अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. आगीत एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. माजी नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे यांच्यासह जाॅगर्स क्लबवरील नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. नागरिकांच्या गर्दीमुळे आग विझविण्यात कर्मचाऱ्यांना अडचण येत होती. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, चार दिवसात शहर परिसरातील आगीची ही तिसरी घटना आहे. वडनेर दुमाला येथील भंगार गोदामाला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. नाशिकरोड रेल्वे स्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या माल डब्यालाही आग लागली होती. सोमवारी फकिरवाडी झोपडपट्टीतही आगीमुळे दोन ते तीन झोपड्यांचे नुकसान झाले.