नाशिक मनपाची सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प

आश्वासन देऊनही ठेकेदार कंपनीने वेतन दिले नाही. त्यामुळे सुमारे ५०० वाहकांनी आंदोलन सुरू केले.

नाशिक : आश्वासन देऊनही ठेकेदाराने वेतन न दिल्याने वाहकांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे शुक्रवारी महापालिकेची सिटीलिंक बस सेवा ठप्प होऊन प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. ही बस सेवा वारंवार ठप्प होत असल्याने प्रवासी वैतागले आहेत.

महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस सेवेत कंत्राटी पध्दतीने वाहक कार्यरत आहेत. ते पुरविण्याचा ठेका ज्या ठेकेदाराला दिला गेला आहे, त्याने मे आणि जून अशा दोन महिन्यांचे वेतन दिले नसल्याने मागील महिन्यात वाहकांनी सलग दोन दिवस संप पुकारला होता. त्यावेळी मनपा, सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार कंपनी याच्यात बैठक होऊन वाहकांचे वेतन दोन दिवसात देण्याचे निश्चित झाले होते. आश्वासन देऊनही ठेकेदार कंपनीने वेतन दिले नाही. त्यामुळे सुमारे ५०० वाहकांनी आंदोलन सुरू केले. परिणामी, शुक्रवारी सकाळपासून सिटीलिंकच्या २०० हून अधिक बस तपोवन आणि नाशिकरोड आगारात उभ्या आहेत.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

सिटीलिंकच्या सुमारे २५० बसेस शहर व ग्रामीण भागात धावतात. हजारो पासधारक विद्यार्थी सिटीलिंकने प्रवास करतात. सकाळी विविध थांब्यांवर त्यांना ताटकळत रहावे लागले. बससेवा बंद असल्याची माहिती समजल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. काही पासधारक विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. नोकरदार वर्गाचे हाल होत आहे.