महापालिकेने साडेबारा हजार फेरीवाल्यांची नोंदणी केलेली आहे.
निश्चित क्षेत्रांऐवजी भलतीकडेच व्यवसाय; वाहतूक कोंडीत भर
शहरात २२५ फेरीवाला क्षेत्र तयार करून फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा निश्चित करून देण्यात आली असली तरी शहरातील कुठल्याही भागात, बहुतांश प्रमुख रस्त्यांवर छोटय़ा-मोठय़ा फेरीवाल्यांनी बस्तान थाटल्याने वाहतूक कोंडीसह पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड झाल्याचे चित्र आहे. महापालिकेने साडेबारा हजार फेरीवाल्यांची नोंदणी केलेली आहे. त्यांना व्यवसायासाठी जागा निश्चिती करूनही ते नेमून दिलेल्या क्षेत्राऐवजी भलतीकडेच व्यवसाय करतात. नोंदणीकृत नसणाऱ्यांना तर कुठलेही सोयरेसुतक नाही. कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांचे रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमण सर्वत्र वाढत आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत महापालिकेने शहरात फेरीवाल्यांसाठी मुक्त, प्रतिबंधित आणि ना फेरीवाला क्षेत्र निश्चित केलेले आहे. शहर फेरीवाला समितीने त्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार शहरात ना फेरीवाला क्षेत्र ८३, मुक्त फेरीवाला क्षेत्र १६६ आणि ५९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सहा विभागांत विभागीय अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने ही क्षेत्रे निश्चित झाली होती. दरम्यानच्या काळात अस्तित्वातील फेरीवाल्यांची बायोमेट्रिक पध्दतीने पहिल्या टप्प्यात ९६३० आणि दुसऱ्या टप्प्यात २९२६ अशी एकूण १२ हजार ५४६ जणांची नोंदणी केली गेली. सहा विभागात २२५ फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले आहे. विभागीय कार्यालयांकडून पथ विक्री प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
या सर्व घटनाक्रमात नोंदणीकृत फेरीवाले आणि संपूर्ण शहरात रस्ते व्यापणारे फेरीवाले यांच्या संख्येत जमीन-आस्मानचे अंतर आहे. मध्यवर्ती बाजारपेठेसह सहाही विभागातील अनेक रस्ते व पदपथांवर फेरीवाल्यांनी ताबा मिळवला आहे. एकाच ठिकाणी अनेक फेरीवाले ठाण मांडतात. काही विक्रेते वाहनांचा वापर करतात. रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून व्यवसाय करतात. काहींनी पदपथावर वेगवेगळी दुकाने थाटली आहेत. नोंदणीकृत फेरीवाले नेमून दिलेल्या जागेऐवजी अन्यत्र व्यवसाय करीत असल्याचे महापालिकेने मान्य केले आहे. याचा फटका वाहनधारकांसह पादचाऱ्यांना बसत आहे. महात्मा गांधी रोड वा मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्त्यांवर हातगाडीवर विक्रेते व्यवसाय करतात.
अडथळेयुक्त शहर
काही वर्षांपूर्वी मनपाने शहर अडथळामुक्त करण्याचा संकल्प केला होता. त्या अंतर्गत मुख्य रस्ते, चौक, पदपथ या ठिकाणी सुयोग्य नियोजन करून अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा सुलभ वापर होण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार होते. सध्याची रस्त्यांवरील स्थिती पाहिली तर अडथळेमुक्त शहराऐवजी अडथळेयुक्त शहराची प्रचीती येत आहे. अनेक पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. पादचाऱ्यांना चालण्यास जागा नाही. जिथे पदपथ नाही, तिथे रस्त्यांलगत बस्तान मांडले जाते. वाहनधारक विक्रेत्यांनी रस्त्यांवरील काही भाग जणू ताब्यात घेतले आहे. कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे धारिष्ठय़ वाढले आहे. ही बाब कुठल्याही भागात अनधिकृतपणे व्यवसाय थाटण्यास प्रोत्साहन देणारी ठरल्याचे दिसत आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या फेरीवाल्यांवर विभागीय स्तरावरून सातत्याने कारवाई केली जाते. जे फेरीवाले नेमून दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त ना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करीत आहे, त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे आता धडक कारवाई केली जाणार आहे. – करुणा डहाळे (उपायुक्त, राष्ट्रीय फेरीवाला धोरण)