नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास

मंगळवारी सायंकाळी उशीरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक : शहरातील गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्याचे पुन्हा सिध्द झाले असून राका काॅलनीतील नवकार रेसिडेन्सीत माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत एक कोटीहून अधिकचे दागिने आणि रोख रकमेची लूट करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी उशीरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

नवकार रेसिडेन्सीतील सदनिकेत डॉ. शैलेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका ममता पाटील कुटूंबियासह राहतात. काही कामानिमित्त ते धुळे येथे गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन एक कोटीहून अधिकचे मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, या इमारतीतील इतर सदनिकांमध्ये रहिवासी असतानाही याविषयी कोणालाही माहीत झाले नाही. मंगळवारी सकाळी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी आल्यावर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. समोरील इमारतीमधील सीसीटीव्ही चित्रणात तीन जण चोरी करत असल्याचे दिसत आहे.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

घरफोडीविषयी नातेवाईकांनी डॉ. पाटील यांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त, स्थानिक गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देत पाहणी केली.