नाशिक :लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील लिपिकास अटक

तक्रारदाराने पत्नीच्या आजारपणावरील उपचाराची दोन वैद्यकीय देयके मंजुरीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सादर केली होती.

वैद्यकीय उपचाराची देयके पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपीक राजेश नेहुलकर विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा रुग्णालयाचा कारभार विविध घटनांमुळे कायम चर्चेत असतो. अलिकडेच रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांचे प्रकरण चांगलेच गाजले. रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना त्रास होत असतो. अशी परिस्थिती असताना आता लाच मागण्याचे प्रकरणही उजेडात येत आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

तक्रारदाराने पत्नीच्या आजारपणावरील उपचाराची दोन वैद्यकीय देयके मंजुरीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सादर केली होती. ही देयके पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात देयकांच्या एकूण रक्कमेच्या पाच टक्के प्रमाणे ३० हजार रुपयांची लाच वरिष्ठ लिपिक राजेश नेहुलकरने मागितली. तडजोडीअंती चार टक्क्यानुसार २४ हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या अनुषंगाने सापळापूर्व पडताळणी करण्यात आली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक नेहुलकरने तक्रारदाराकडे पंचासमक्ष २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित नेहुलकरला अटक केली. त्याच्याविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी वा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले