नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप

वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती.

नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वणी स्थानकात बसच्या इंजिनने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. बसमधील २७ प्रवाशांना त्वरीत उतरवून आग विझविण्यात आली. वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती. बसमध्ये प्रवासी बसले होते. अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला. इंजिनने पेट घेतला.

हे वाचले का?  सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

चालक बाबाजी गवळी यांनी प्रसंगावधान सर्व तऱ्हेची खबरदारी घेतली. वाहक ज्योती नाडे यांनी बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरविले. बसमधील अग्निरोधक सिलिंडर अकार्यक्षम असल्याने चालुच झाले नाही. गाडीचा गिअर सटकून गाडी मागे जाऊ लागली. त्यावेळी गाडी पूर्ण रिकामी होती. गाडीमागे कुठलीही दुसरी गाडी आणि प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. उपस्थित तुषार शर्मा, वर्तमानपत्र विक्रेते सुनील महाले, वाहतूक नियंत्रक के. के. चौरे, चालक गवळी यांसह उपस्थित प्रवासी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकून गाडी थांबवली.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

बसमध्ये चालकाने ठेवलेल्या कॅनमधील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आग विझली नाही. स्थानकात असलेल्या प्रवाशांनी धाव घेऊन वाळू, माती, पाणी टाकून आग विझवली. चालकाचे सीट आणि जवळचा भाग खाक झाला. या बसमध्ये २७ प्रवासी होते. प्रवाशांना तातडीने गाडीबाहेर उतरविण्यात आल्याने कोणी जखमी झाले नाही.