नाशिक : वर्गात किमान ५० विद्यार्थी – पटसंख्या वाढविण्यासाठी मनपाची प्रवेश मोहीम

मनपाच्या स्मार्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत ६९ शाळांममध्ये ६५६ वर्ग डिजिटल होणार आहेत.

मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे मनपाच्या शाळांना घरघर लागली. केवळ शाळाच नव्हे तर, विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चू होऊनही मनपाच्या शाळांची अवस्था बदलू शकली नाही. आता मनपाच्या स्मार्ट स्कूल या प्रकल्पांतर्गत ६९ शाळांममध्ये ६५६ वर्ग डिजिटल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रवेशाची खास मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी हे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे.

मनपाच्या अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी स्वतंत्र तरतूद असते. मनपाच्या शाळांवर बराच निधी खर्च होऊनही पायाभूत सुविधांची वानवा जाणवते. विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे कारण दाखवत काही शाळा बंद करून जवळच्या शाळेत समायोजित करण्यात आल्या. शालिमारलगतची बी. डी. भालेकर त्यापैकीच एक. या शाळेतील विद्यार्थी संख्या घटल्याचा फटका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला होता. संबंधितांसह शिक्षकांना सातपूर वा दूरवरील शाळेत वर्ग करण्यात आले. इतक्या दूरवर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कसे जाणार, हा प्रश्न उपस्थित झाला. ही शाळा बंद करू नये म्हणून विद्यार्थ्यांसह नागरिक रस्त्यावर उतरले होते. मात्र प्रशासनाने सर्वांकडे दुर्लक्ष करीत हा निर्णय अमलात आणला. अन्य शाळेत वर्ग गेल्याने किती विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असेल, हा प्रश्न आहे.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

या एकंदर स्थितीत मनपाला आता पटसंख्या वाढविण्याची उपरती झाली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जुंपले जाणार आहे. महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या प्रकल्पांतर्गत ६९ शाळांचे ६५६ वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी प्रवेश मोहीम राबविली जात आहे. सध्या शिक्षकांच्या पालकांसमवेत बैठका सुरू आहेत. लवकरच शाळा प्रवेश उत्सव सुरू होणार आहे. प्रवेश पात्र विद्यार्थी आणि पालक यांना शाळेत बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाईल. शाळा प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाणार आहे. सर्व शाळांची पटसंख्या जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी असे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

सद्यस्थिती काय ?

मनपाच्या प्राथमिक ८८ आणि माध्यमिक १२ अशा एकूण १०० शाळा आहेत. सुमारे २९ हजार पटसंख्या आहे. शाळा प्रवेश उत्सव यशस्वीपणे राबवून पटसंख्या ५० हजारपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण ८९६ शिक्षक असून प्राथमिकचे ८३८ आणि माध्यमिकचे ५८ आहेत.

पटसंख्या वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत

‘स्मार्ट स्कूल’ प्रकल्पाद्वारे मनपाच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करुन देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या शाळांमध्ये तळागाळातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच वंचित घटकांतील मुला-मुलींना विनामूल्य शिक्षण दिले जाते. हे शिक्षण गरजूपर्यंत पोहचावे, याकरिता सर्वांनी तातडीने प्रवेश मोहीम गांभिर्याने हाती घ्यावी, अशी सूचना शिक्षण विभागाने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना केली आहे. स्मार्ट स्कूल प्रकल्पांत डिजिटल शिक्षणाच्या सोयी समाविष्ट आहेत. शाळांच्या सुशोभिकरणासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी. पटसंख्या वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे आवाहन शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी केले आहे.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा