नाशिक : विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासद करण्याचा उपक्रम ; अमलबजावणीत अडथळेच अधिक

शिक्षण विभागाकडून माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत वाचन प्रेरणा दिन साजरा होतो.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वृध्दिंगत व्हावी, यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवित असते. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त वाचनालयाचे सभासद व्हावे, या शिक्षण आयुक्तालयाच्या उपक्रमाची भर पडली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे वेळापत्रक लक्षात घेता किती विद्यार्थी वाचनालयापर्यंत पोहचतील, वाचनालय विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचू शकेल, यासह वेगवेगळ्या प्रश्नांची मालिका उभी राहिली आहे.

शिक्षण विभागाकडून माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत वाचन प्रेरणा दिन साजरा होतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी होते. परंतु, यामध्ये सातत्य आढळून येत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे महत्व रुजावे, यासाठी शिक्षण आयुक्तालयाकडून विद्यार्थ्यांना शासन मान्यताप्राप्त ग्रंथालयांचे वर्गणीदार-सभासद व्हावे, अशी सूचना करण्यात आली आहे. या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना पत्र देण्यात आले आहे. वाचनालयात विविध प्रकारची ग्रंथसंपदा आहे. शालेय ग्रंथालयातील ग्रंथसंपदेवर मर्यादा येते. बऱ्याच शाळांमध्ये नवीन पुस्तक अथवा ग्रंथ खरेदी झालेली नाही. काही शाळांमध्ये ग्रंथपालपद रिक्त आहे. अशा स्थितीत वाचन सातत्यात खंड पडतो. हे लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजावी, यासाठी शासन मान्यता प्राप्त ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाचनाची आवड जोपासली जावू शकते. तेथील शुल्कही नाममात्र असते. या संदर्भातील मान्यताप्राप्त ग्रंथालयाची यादी ग्रंथालय संचालनालयाकडून प्राप्त करून घ्यावी, अशी पुष्टीही जोडण्यात आली आहे. वास्तविक करोना काळातील दोन वर्षात विद्यार्थी हे वाचनापासून दूर गेले असून समाज माध्यमात सक्रिय झाले आहेत. हा उपक्रम सहावीपासून पुढे राबविण्याची सूचना आहे. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे दैनंदिन वेळापत्रक पाहता त्यांना वाचनालयापर्यंत पोहचण्यास वेळ कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाकडून या उपक्रमाची आखणी, अमलबजावणी कशी होते, याविषयी उत्सुकता आहे.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

विद्यार्थी वाचनालयापर्यंत पोहचु शकत नाही. नाशिक शहराचा विचार केला तर लायब्ररी ऑन व्हील या संकल्पनेवर शहरातील सार्वजनिक वाचनालय नाशिक यासह अन्य मान्यताप्राप्त ग्रंथालयांनी शाळेपर्यंत पोहचावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजावी, यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांना ग्रंथालय संचनालयाकडून यादी मिळविण्याची सूचना केली आहे. विद्यार्थी वाचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांचा कल वाचनाकडे वळावा, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.