नाशिक विभागातील मान्सूनपूर्व तयारीचा आज मुख्यमंत्र्यांकडून आढावा

नाशिक विभागात ३१६१ गाव-वाड्यांना सध्या टँकरने पाणी द्यावी लागत आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टँकर आहेत.

नाशिक: प्रचंड उकाडा व दुष्काळाचे चटके बसत असताना आगामी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दृकश्राव्य माध्यमातून घेणार आहेत. या निमित्ताने दुष्काळी स्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही विषयांवर मंथन होणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सोमवारीच दृकश्राव्य माध्यमातून घेतला जाणार होता. परंतु, ही बैठक एक दिवस लांबणीवर पडली. आता ती मंगळवारी होत आहे. नाशिक विभागात ३१६१ गाव-वाड्यांना सध्या टँकरने पाणी द्यावी लागत आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टँकर आहेत. विभागात गावांसाठी २०८ तर टँकरसाठी २४३ अशा एकूण ४५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. नाशिक आणि सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. नगर जिल्ह्यात काही ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. विविध शासकीय विभागांमार्फत केल्या गेलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून दृकश्राव्य माध्यमातून घेतला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. बैठकीत नाशिक व मालेगाव महापालिकेसह, जिल्हा प्रशासन आणि पाचही जिल्ह्यातील स्थानिक यंत्रणांचे प्रमुख सहभागी होतील. मान्सून काळात भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आराखडा तयार करणे अभिप्रेत आहे. परस्पर समन्वयाने यंत्रणांची आपत्ती काळात जलद प्रतिसादाची सज्जता महत्वाची आहे. बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

आठ बोटी, १२ तंबू…

पावसाळ्यात पूरासह नैसर्गिक आपत्तीची स्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यास आठ नवीन बोट आणि १२ तंबू मिळाले आहेत. याआधी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे दोन बोट आहेत. तर चार तंबू आहेत. आपत्कालीन स्थितीत तंबू उभारून तात्पुरती व्यवस्था करता येते. वैद्यकीय कक्ष वा बचाव पथकाची तंबूूत व्यवस्था करता येते. १० नगरपरिषदांना प्रत्येकी एक आणि नाशिक व मालेगाव महापालिकेसाठी प्रत्येकी एक असे एकूण १२ नवीन तंबू प्राप्त झाले आहेत. सायखेडा येथे तीन बोटी आधीपासून आहेत. या व्यतिरिक्त नाशिक महापालिकेची सामग्री आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने ४० बोटी खरेदी केल्याचे सांगितले जाते. यातील नाशिकला आठ, धुळ्यासाठी सहा, जळगाव तीन, नंदुरबार चार बोटी मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रबरी स्वरुपातील या बोटीची एकावेळी आठ ते १० व्यक्तींना वाहून नेण्याची क्षमता आहे.