नाशिक : शासन आपल्या दारीसाठी लाभार्थी वाढविण्याची धडपड; जिल्हा परिषदेतर्फे दोन लाखहून अधिक जणांना लाभ, प्रमाणपत्र

शनिवारी सकाळी ११ वाजता गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारीचा मुख्य कार्यक्रम होत आहे.

नाशिक – शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने दोन दिवस राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या विशेष मोहिमेत दोन लाख आठ हजार ३१६ जणांना लाभ अथवा प्रमाणपत्र देण्यात आले.शनिवारी सकाळी ११ वाजता गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारीचा मुख्य कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमार्फत विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिकांना ग्रामपंचायत, आरोग्य, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी, महिला व बालकल्याण या विभागाशी संलग्न योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी दाखले, नमुना क्रमांक आठचा उतारा, दारिद्र्य रेषेखालील दाखला, ग्रामपंचायत येणे नसल्याचे दाखले, निराधार असल्याचा दाखला, व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखला, इमारत बांधकाम परवानगी, नळ जोडणी, थकबाकी प्रलंबित नसल्याचा दाखला, कोणत्याही योजनांमधून लाभ न मिळाल्याचा दाखला, नरेगा जॉबकार्ड वितरण, वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर करणे, सुविधा संपन्न कुटुंब लाभ, पात्र व्यक्तींना सिंचन विहिरी, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आदींचे हप्ते वितरण, आयुषमान भारत गोल्डन कार्ड वितरण आदी स्वरुपाचे लाभ व प्रमाणपत्र देण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

तालुकानिहाय आकडेवारी

दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १३३१ ग्रामपंचायतीत एकूण २०८३१६ जणांना शासकीय योजनांचे लाभ व प्रमाणपत्र देण्यात आले. यात सुरगाणा तालुक्यात १९ हजार ७६९, पेठ ३८ हजार ३०२, इगतपुरी २९ हजार ४८६, बागलाण १५ हजार ४०४, मालेगाव २६ हजार ६००, दिंडोरीत १८ हजार १४४, त्र्यंबकेश्वरमध्ये १६ हजार ०७४, कळवण १० हजार ५४६, चांदवड सहा हजार ९५, नाशिक सात हजार ६०७, नांदगाव चार हजार ९५, सिन्नर तीन हजार १३५, देवळा पाच हजार ६००, निफाड चार हजार ६३६, येवला तालुक्यात १९९३ लाभार्थ्यांचा समावेश आहे.