नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाकडून संदीप गुळवे निश्चित; किशोर दराडेंना शह देण्याची तयारी

या मतदारसंघात गतवेळी शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे विजयी झाले होते. त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत.

नाशिक – नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे हे पक्षीय कामात व लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारातही सक्रिय न राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचे पदाधिकारी ॲड. संदीप गुळवे यांना पक्षात प्रवेश देत या मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. शनिवारी मुंबईतील शिवसेना भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी ॲड. संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, अनंत गिते, अरविंद सावंत, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, शिक्षक सेना विभागाचे अध्यक्ष संजय चव्हाण आदी उपस्थित होते. गुळवे हे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांचे नेतृत्व करतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

या मतदारसंघात गतवेळी शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे हे विजयी झाले होते. त्यांचे बंधू नरेंद्र दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. नरेंद्र दराडे पक्षात सक्रिय असले तरी किशोर दराडे हे अलिप्त राहिले. जानेवारीत शिवसेनेचे नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. अधिवेशन व सभेतही किशोर दराडे आले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून ते अलिप्त राहिले. ठाकरे गटाच्या कार्यक्रमात सहभागी न होणारे किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात मात्र दृष्टीपथास पडत होते, याकडे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी लक्ष वेधले. त्यांची कार्यपध्दती लक्षात घेऊन ठाकरे गटाने या जागेवर पर्यायी उमेदवाराची चाचपणी केली. त्या अनुषंगाने गुळवे यांचा पक्ष प्रवेश पार पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. ते परतल्यानंतर गुळवे यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा होईल, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.