नाशिक: १०४ गाव, वाड्यांना टँकरने पाणी

पावसाळा सुरु होऊन सव्वा दोन महिने उलटून गेल्यानंतरही अनेक भागातील टंचाईचे संकट अद्याप दूर झालेले नाही.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: पावसाळा सुरु होऊन सव्वा दोन महिने उलटून गेल्यानंतरही अनेक भागातील टंचाईचे संकट अद्याप दूर झालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६६ गावे, ३८ वाड्या अशा एकूण १०४ ठिकाणी ५५ टँकरद्वारे पिण्याचे पाणी द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात सुरू झालेले हे टँकर ऑगस्टच्या मध्यापर्यंत कायम राहणे, ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असावी.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

यंदा बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला नसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. सद्यस्थितीत सहा तालुक्यात टँकरने पिण्याचे पाणी द्यावे लागत आहे. येवल्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य आहे. या तालुक्यातील सर्वाधिक २९ गावे, १५ वाड्यांना १६ टँकरने पाणी पुरविले जात आहे. बागलाणमधील तीन गावे आणि चार वाड्या (तीन टँकर), चांदवड तालुक्यात १६ गावे आणि सहा वाड्या (१० टँकर), देवळा तीन गावे व तीन वाडी (चार टँकर), नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात १० गावे व आठ वाड्यांना (१३ टँकर), सिन्नर तालुक्यातील दोन वाड्यांना (एक टँकर), अशा प्रकारे ६६ गावे व ३८ वाड्यांसाठी एकूण ५५ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

गावातील पाणी पुरवठ्यासाठी २५ विहिरींचे तर टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरच्या १२३ फेऱ्यांमधून एक लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येला पिण्याचे पाणी दिले जात आहे. पावसाळ्यात पाणी टंचाईची धग कायम राहिल्याचे दिसत आहे. पुढील काळात पाऊस न झाल्यास टंचाईचा प्रश्न अधिक बिकट स्वरुप धारण करण्याची धास्ती व्यक्त होत आहे.