अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) चाचणी गळीत हंगाम सुरू करण्यात आल्यावर कारखान्यापुढे आता ऊसतोड कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
नाशिक: अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) चाचणी गळीत हंगाम सुरू करण्यात आल्यावर कारखान्यापुढे आता ऊसतोड कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ऊस उत्पादकांनी त्यांचेकडील ऊस तोडणी करून गळितासाठी कारखान्यावर पाठविल्यास त्यांचे तोडणी आणि वाहतुकीचे पैसे काटय़ावर दिले जातील, असे आवाहन नऊ वर्षांपासून बंद असलेले कारखाना चालविण्यासाठी घेतल्यानंतर खा. हेमंत गोडसे यांना करावे लागले आहे.
नाशिक सहकारी साखर कारखाना दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून खासदार गोडसे आणि त्यांचे सहकारी यांनी अवघ्या दीड महिन्यात यंत्रांची दुरुस्ती करून चाचणी गळीत हंगामासाठी सज्ज केला. राज्यात गळीत हंगाम संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना ‘नासाका’ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उभ्या उसाचे नुकसना होऊ नये, या हेतूने कारखान्याकडून चाचणी गळीत हंगाम घेतला जात आहे, परंतु, त्यात ऊसतोड मजुरांच्या कमतरतेचा अडथळा निर्माण झाला आहे. नऊ वर्षांपासून बंद पडलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम चाचणी सोमवारी यशस्वी झाली. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक या तालुक्यातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जबाजारीपणामुळे कारखाना बंद होता. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक या तालुक्यातील ऊस उत्पादकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. कारखान्याची सुत्रे दोन महिन्यापूर्वी खासदार गोडसे आणि दीपक बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्याकडे आली. गोडसे यांनी आपले संघटन कौशल्य पणाला लावत कारखाना सुरू करण्याचा निर्धार करुन कारखान्यातील यंत्रांची दुरुस्ती केली. अवघ्या महिनाभरात कारखान्याचे अग्निप्रदीपन करण्यात आले. यंत्रांची दुरुस्ती झाल्यानंतर सोमवारी गळीत हंगामाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने आता चाचणी गळीत हंगामाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. परंतु, त्यात ऊसतोड मजूर कमी असल्याने वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.
ऊसतोड मजुरांची कमतरता लक्षात घेता या आव्हानाला तोंड देण्यासाठी ऊस उत्पादकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे खासदार गोडसे यांनी म्हटले आहे, ऊस उत्पादकांनी आपल्या शेतातील उसाची तोडणी करून कारखान्यावर पोहोच केल्यास कारखान्यामार्फत त्यांना तोडणी आणि वाहतुकीचे पैसे काटा करताना दिले जातील. हा चाचणी गळीत हंगाम यशस्वी करून पुढील गळीत हंगामाची जोरदार तयारी करावयाची असल्याने शेतकऱ्यांनी कारखान्याला सहकार्य करण्याचे आवाहन गोडसे आणि त्यांच्या सहकार्यानी केले आहे. कारखाना चालविण्यासाठी उस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वाची साथ फार महत्वाची आहे. त्यामुळेच नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या चारही तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या कल्याणासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन गोडसे यांच्याकडून करण्यात आले आहे.