नुकसानग्रस्तांना अधिक मदतीची गरज ; सिन्नर दौऱ्यात अंबादास दानवे यांची मागणी

सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम अतिशय संथपणे सुरू आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याची आवश्यकता आहे. शासकीय नियम बदलून जास्त मदत मिळणे गरजेचे असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. सिन्नर भागात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील वंजारवाडीसह आसपासच्या परिसरातील नुकसानीची सोमवारी दानवे यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी महसूल प्रशासनाने पंचनामे करताना पिके लागवड, मिल्चग पेपर, ठिबक, बांबू, पाइप यासह त्यासाठी लागलेली मजुरी, शेताचे झालेले नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याची गरज मांडली.

गावातील अंगणवाडीसह घरे बाधित असतील तर वेगळी नोंद करा, असेही त्यांनी सूचित केले. वंजारवाडी, लोहिशगवे गावांमधील १८० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली. दानवेंनी गावातील मारुती मंदिरासमोरील शिवाजी शिंदे यांच्या शेतीची झालेली नुकसानीची पाहणी केली. अपंग दुकानदार गोपाळ सामोरे यांचे दुकान मळय़ालगत होते. तेही पावसामुळे वाहून गेल्याने नुकसान झाले. अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी त्यांना निवेदन दिले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार योगेश घोलप, वाजे, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर धांडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब काळे, उपसरपंच बाळू लोहरे आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

अमित शहांचे मुंबईवरील प्रेम बेगडी – दानवे
मुंबईतील गणेशोत्सवाचे संपूर्ण जगाला आकर्षण आहे. पुतना मावशीचे प्रेम दाखविणाऱ्या भाजपकडून मुंबईचे महत्त्व कमी केले जात आहे. त्यांचे मुंबईवरील प्रेम बेगडी असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीकास्त्र सोडले. सिन्नर भागातील नुकंसानीच्या पाहणीप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दानवे यांनी मनसेच्या दुटप्पी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपने आमच्या ४० आमदारांना घेतले. आता ते मनसेच्या मागे लागले आहेत. कारण भाजपला स्वत:चे बळ अपुरे असल्याची जाणीव आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील जनता शिवसेनेसोबत राहील. केंद्र सरकार महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्यांनी म्हटल्याचा संदर्भ दानवे यांनी दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागे व्हिडीओव्दारे भाजपची लक्तरे वेशीवर टांगली होती. नंतर भोंगा आंदोलन केले. उत्तर भारतीयांविरुद्धचे आंदोलन केले. त्यामुळे आता हे किती दुटप्पीपणे वागत आहेत, ते स्पष्ट होईल. शिवसेनेला अनेकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वाना शिवसेना पुरून उरल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीच्या जागेत होईल, असेही त्यांनी नमूद केले.