नोव्हेंबरच्या मध्यात नाशिकचे साहित्य संमेलन?

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सहकार्याने आणि लोकहितवादी मंडळाच्या वतीने येथील गोखले शैक्षणिक संस्थेच्या आवारात ९४वे साहित्य संमेलन होणार आहे.

नाशिक : करोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित झालेले ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत घेण्याविषयी  हालचाली गतिमान झाल्या आहेत. परंतु याच कालावधीत महाविद्यालये सुरू होत असल्याने आणि संमेलनाचे ठिकाण महाविद्यालयाचे मैदान असल्याने  नियोजन कसे करायचे, हा तिढा सोडविण्याचे आव्हान आता आयोजकांपुढे आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सहकार्याने आणि लोकहितवादी मंडळाच्या वतीने येथील गोखले शैक्षणिक संस्थेच्या आवारात ९४वे साहित्य संमेलन होणार आहे. प्रारंभी मार्चअखेर हे संमेलन होणार होते. परंतु वाढत्या करोना संसर्गामुळे संमेलन स्थगित करण्यात आले. सद्य:स्थितीत करोना रुग्णसंख्या कमी झाली असून सर्व दैनंदिन व्यवहार पूर्ववत होत  आहेत. करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने साहित्य संमेलन घेण्याची तयारी आयोजकांनी सुरू केली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सोबतच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत संमेलन घेणे शक्य आहे काय, याविषयी मंथन करण्यात आले

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

दरम्यान, याच कालावधीत दीड वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाविद्यालये सुरू होणार आहेत. अशा स्थितीत संमेलनस्थळ, तेथील निवास व्यवस्था, पुस्तक प्रदर्शन आदींसाठी जागा कशी उपलब्ध होणार, संमेलनानिमित्त होणारी गर्दी कशी नियंत्रणात आणायची, याविषयी चर्चा सुरू असून वेगवेगळे पर्याय तपासून पाहण्यात येत आहेत.  याविषयी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगांवकर यांनी भूमिका मांडली.

संमेलनासाठी गोखले शिक्षण संस्थेसह अन्य शैक्षणिक संस्था मदत करणार होत्या. परंतु आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने निवास व्यवस्थेसह अन्य व्यवस्था अशा ठिकाणी कशी करायची, हा प्रश्न आहे. याविषयी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित