‘नो पार्किंग’मधील वाहनांविरुद्ध आजपासून दंडात्मक कारवाई

शहरात सध्या कारवाईचा धाक नसल्याने कुठेही कशाही पध्दतीने वाहने उभी केली जात आहेत.

दुचाकीसाठी २९०, चारचाकींना ५५० रुपये; वाद टाळण्यासाठी भोंग्याद्वारे पूर्वसूचना

नाशिक : मध्यवर्ती बाजारपेठेसह इतरत्र झालेले खोदकाम आणि रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे उभी केली जाणारी वाहने यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून यावर नियंत्रण आणण्याबरोबर बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीत आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून तळ सोडून इतरत्र (नो पार्किंग) क्षेत्रात उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर बुधवारपासून पुन्हा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याआधी ही कारवाई अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी कार्यवाहीची पध्दत बदलली. थेट वाहने नेण्याऐवजी प्रथम भोंगा वाजवून, ध्वनिक्षेपकाद्वारे इशारा दिला जाईल. कारवाईवेळी वाहनधारक उपस्थित असल्यास केवळ मोटार वाहन कायद्यान्वये दंडाची आकारणी केली जाणार आहे.

शहरात सध्या कारवाईचा धाक नसल्याने कुठेही कशाही पध्दतीने वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी नित्याची समस्या बनली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वाहतूक पोलीस कारवाई करतात. परंतु, वाहनधारक वाहन सोडून इतरत्र गेल्यामुळे वाहन बाजुला करून वाहतूक सुरळीत करणे शक्य होत नाही. आता ‘नो पार्किंग’मधील वाहने नेण्यासाठी पाच परिसर निश्चित करण्यात आले आहेत. नो पार्किंगमध्ये वाहन आढळल्यास छायाचित्र, छायाचित्रण केले जाणार आहे. वाहनांचे नुकसान होणार नाही अशा हायड्रोलिक व्यवस्थेद्वारे वाहने उचलली जातील. वाहनधारकांकडून वाहन उचलून नेण्याचा आणि मोटार वाहन कायद्यानुसारचा दंड आकारला जाईल.  दुचाकी वाहने नेल्यास २९० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी २०१ आणि चारचाकी वाहनांसाठी ५५० रुपयांचा दंड वाहनधारकांना भरावा लागणार आहे. अशा भागात शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींची वाहने असल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. वाहनाचे नुकसान झाल्यास ठेकेदारास त्याच दिवशी नुकसान भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम गायकवाड, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले आदींच्या उपस्थितीत आयुक्तालयात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. बुधवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात होणार आहे. वाहनधारकांनी आपली वाहने ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभी करू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या भागात होणार कारवाई

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

शहरातील गर्दीच्या आणि मुख्य बाजारपेठेचा भाग असणाऱ्या पाच परिसरात वाहने ताब्यात घेण्याची कारवाई होईल. सीबीएस / शालिमार, महामार्ग बसस्थानक, सिटी सेंटर मॉल, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा परिसरात ही कारवाई होईल. सीबीएस ते शालिमार परिसरात सीबीएस-मेहेर, मेळा बसस्थानक-शरणपूर रोड, अशोक स्तंभ-रामवाडी पूल, एमजी रोड-सांगली बँक रस्ता असे एकूण १० रस्ते परिसर, महामार्ग बसस्थानकासमोरील मानवता कर्करोग रुग्णालय ते जगदीश मोटार गॅरेजचा परिसर, रविवार कारंजा परिसरात अहिल्याबाई होळकर पूल ते सांगली बँक सिग्नल रस्ता आणि पंचवटी परिसरात निमाणी बस स्थानक समोरील परिसर, दिंडोरी नाक्यावरील रुपश्री इमारत ते निमाणी बसस्थानकपर्र्यंतचा रस्ता, दिंडोरी नाक्यावरील मजेठिया वखार ते प्रभात प्लायवूडपर्यंतचा रस्ता, रामकुंड पोलीस चौकी ते कपालेश्वर मंदिरपर्यंतचा परिसर असे १७ रस्ते, चौक व परिसर नो पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी याच भागात कारवाई केली जाणार आहे.

हे वाचले का?  नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका