पंकजा मुंडे या साखर कारखानदारांच्या हातातील बाहुले

सीटूप्रणीत महाराष्ट्र ऊस तोडणी, वाहतूक कामगार संघटनेचा आरोप

सीटूप्रणीत महाराष्ट्र ऊस तोडणी, वाहतूक कामगार संघटनेचा आरोप

नाशिक : अंबेजोगाई येथील मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी २१ रुपये प्रति टन वाढ द्यावी, अशी भूमिका घेऊन ऊसतोडणी कामगार, मुकादम यांच्या पाठीत खंजीर खुपसला. पंकजा मुंडे या कारखानदारांच्या हातातील बाहुले बनल्याचा आरोप सीटूप्रणीत महाराष्ट्र ऊसतोडणी, वाहतूक कामगार संघटनेने केला आहे.

राज्यातील ऊसतोडणी, वाहतूक कामगारांच्या संघटनांच्या मागण्यांबाबत मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील वसंतदादा साखर संस्थेत बैठक होणार आहे. त्यात द्विसदस्यीय लवाद, पंकजा मुंडे आणि ऊसतोड, वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

या बैठकीआधीच ऊसतोड कामगार, वाहतूकदारांच्या मागण्यांवरून मुंडे आणि अन्य संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. अंबेजोगाई येथील मेळाव्यात मुंडे यांनी २१ रुपये प्रति टन वाढ देण्याची भूमिका घेतली होती. त्यास पाच ऊसतोड कामगार संघटनांचा विरोध असल्याकडे महाराष्ट्र ऊसतोडणी, वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी लक्ष वेधले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांनी सोडून दिला आहे. त्यांनी कोणत्याही संघटनेशी चर्चा केलेली नाही. त्यांना असा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे  डॉ. कराड यांनी सांगितले.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

सातपैकी पाच ऊसतोडणी कामगार संघटनांनी लवादाला विरोध केला आहे. तशा आशयाचे लेखी पत्र राज्य सहकारी साखर संघाला पाठवले आहे. याउपरही लवादामार्फत निर्णय लादल्यास त्याचे तीव्र परिणाम होतील. सीटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी, वाहतूक कामगार संघटना आणि अन्य पाच संघटना संप सुरूच ठेवतील. मंगळवारच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा कराड यांनी दिला आहे.