पंतप्रधानांकडून मंत्र्यांसाठी नियमावली; जी-२० शिखर परिषदेसाठी केंद्र सरकारकडून तयारी पूर्ण

जी-२० शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्र्यांसाठी काय करावे आणि काय करू नये यासंबंधी नियमावली तयारी केली.

जी-२० शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्र्यांसाठी काय करावे आणि काय करू नये यासंबंधी नियमावली तयारी केली. शिखर परिषदेला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत वाहनांचा वापर करू नये. भारत मंडपम आणि विविध सभांच्या ठिकाणी जाण्यासाठी शटल सेवेचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना ‘जी-२० इंडिया’ मोबाइलअ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले आहे. परदेशी मान्यवरांशी संभाषण करताना त्याचे भाषांतर आणि इतर वैशिष्टय़ांचा सर्वोत्तम वापर करण्यास सांगितले आहे. जी-२० इंडिया मोबाइल अ‍ॅपद्वारे सर्व भारतीय भाषा आणि जी-२० राष्ट्रांच्या भाषांचे झटपट भाषांतर करण्यात येते.

९ ते १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेला आंतरराष्ट्रीय संघटनांसह जवळपास ४० जागतिक नेते उपस्थित राहणार असून परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी मंत्र्यांना राजशिष्टाचार आणि संबंधित बाबींची तपशीलवार माहिती दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. एस. सिंह बघेल यांनी मंगळवारी दिल्लीत आगमन झाल्यावर नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांचे स्वागत केले. सुमारे एक तास चाललेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी झालेल्या अनौपचारिक संवादादरम्यान मंत्र्यांना ही परिषद भारतासाठी आणि जागतिक प्रतिमेसाठी किती महत्त्वाची आहे याची माहिती देण्यात आली.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

इंडिया गेट, कर्तव्य पथ सामान्यांसाठी बंद

जी-२० परिषदेच्या निमित्ताने इंडिया गेट, कर्तव्य पथ येथे सर्वसामान्य नागरिकांना दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी चालण्यास, सायकिलग करण्यास आणि पर्यटन करण्यास येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले. इंडिया गेट, कर्तव्य पथ परिसर नियंत्रित विभाग म्हणून जाहीर केले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून गाडय़ा चालविण्याची विनंती दिल्ली मेट्रो विभागाला केली आहे, असे पोलीस प्रमुखांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंच्या ऑनलाइन वितरणास परवानगी दिली जाईल परंतु नवी दिल्ली जिल्ह्यात अन्न वितरण सेवांवर निर्बंध असेल. जी-२०ची प्रवेशिका असलेले माध्यम कर्मचारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जमतील आणि त्यांना कार्यक्रमस्थळी नेले जाईल. परंतु टॅक्सींना परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

‘‘कोणत्याही प्रसारमाध्यमांना त्यांच्या कार्यालयात जाण्यापासून रोखले जाणार नाही, परंतु त्यांना त्यांच्या संस्थेचे ओळखपत्र दाखवावे लागेल. आम्ही माध्यमांना वारंवार विनंती करत आहोत की ते कव्हरेजसाठी मेट्रो सेवा वापरू शकतात,’’ असे ते म्हणाले.हवामान, विकास बँका यावर लक्ष; अमेरिकी अध्यक्षांच्या प्राधान्यक्रमाची माहिती जी-२० शिखर परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन काही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली. त्यामध्ये विकसित देशांची कामगिरी; हवामान, तंत्रज्ञान आणि बहुस्तरीय विकास बँकांची पुनर्रचना यांचा समावेश आहे असे सांगण्यात आले. अध्यक्ष बायडेन यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्दय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी-२० समूह या मुद्दय़ांवर प्रगती करेल अशी आशा व्हाइट हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आली. जी-२० शिखर परिषदेसाठी जो बायडेन गुरुवारी निघणार आहेत. शुक्रवारी ते पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील आणि शनिवार व रविवार या दोन दिवशी जी-२० शिखर परिषदेच्या अधिकृत सत्रांमध्ये सहभागी होतील. अमेरिकेची जी-२० प्रति असलेली बांधिलकी कमी झालेली नाही आणि आव्हानात्मक कालखंडामध्ये जगातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्था एकत्रितरीत्या काम करू शकतात हे नवी दिल्लीत होणाऱ्या शिखर परिषदेमध्ये दिसून येईल असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

संस्कृतीसंबंधी कलाकुसर असलेल्या चांदीच्या भांडय़ांमध्ये जेवण

जी-२० शिखर परिषदेला उपस्थित असलेले विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रमुख नेत्यांसाठी चांदीच्या भांडय़ांमध्ये जेवण दिले जाणार आहे. या चांदीच्या भांडय़ांवर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती असतील, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. जयपूरमधील भांडीनिर्मिती करणाऱ्या कंपनीला याबाबत कंत्राट देण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी २०० कारागिरांनी तब्बल १५ हजार चांदीची भांडी बनविली आहेत. जयपूर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि देशाच्या इतर भागांतील कारागिरांनी या भांडय़ांवर कलाकुसर केली आहे.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

भरड धान्यांचा प्रचार

ओडिशाच्या भूमिया समुदयातील एका ३६ वर्षीय आदिवासी महिला शेतऱ्याला जी-२० परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे. रायमती घिऊरिया असे या महिलेचे नाव असून बाजरीसह भरड धान्यांचा प्रचार या परिषदेत त्या करणार आहेत. भरड धान्यांपासून तयार होणारे विविध पदार्थाचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून भरड धान्यांपासून रांगोळीही काढण्यात येणार आहे. या महिलेने ओडिशा मिलेट मिशन या योजनेद्वारे सादर केलेल्या उत्तम तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या महत्त्वावर जोर दिला, ज्यामुळे कोरापट जिल्ह्यातील बाजरी शेतीचे उत्पादन आणि गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.