पथनाटय़ांद्वारे करोना प्रतिबंध, गोदावरी प्रदूषणमुक्तीवर जनजागृती

शासकीय योजना तसेच राज्य शासनाने वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यत पथनाटय़ाद्वारे सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शासकीय योजना तसेच राज्य शासनाने वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यत पथनाटय़ाद्वारे सुरुवात झाली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने निवड झालेली कलापथके  आठ दिवस जिल्ह्यतील १५ तालुक्यांमध्ये पथनाटय़ करणार आहेत. या पथनाटय़ात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर करोना लसीकरणाची माहिती दिली जात आहे. तसेच गोदावरी नदी प्रदूषणमुक्त राखण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

पथनाटय़ांचे सादरीकरण करणाऱ्या पथकांमध्ये निफाड येथील कुलस्वामिनी लोकप्रबोधन मंच, सटाणा येथील चिराग पथक, सचिन शिंदे अकॅ डमी फॉर परफॉर्मिंग आर्टस, चाणक्य कलामंच, शाही कला पथक, इगतपुरी येथील बाळासाहेब लालू भगत आणि सहकारी लोककला पथक, इगतपुरी येथील आनंद तरंग फाऊंडेशन आणि स्वामी विवेकानंद कलापथक यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात अजूनही करोनाविषयी अनेक गैरसमज आहेत. तसेच करोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने जणूकाही करोना संपूर्णपणे हद्दपार झाल्याचा समज करून घेत लग्न, बैठका, धार्मिक कार्यक्र मांना मोठय़ा संख्येने नागरिक गर्दी करत आहेत. शासनाने करोना प्रतिबंधासाठी आखून दिलेले नियम पाळले जात नसल्याचे उघड होत आहे. अजूनही करोनाचे रूग्ण सापडत असून तो पुन्हा अधिक प्रमाणावर पसरू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या वतीने त्या संदर्भात करण्यात येणारी जनजागृती शहरी भाग ध्यानात ठेवून के ली जात असल्याने ग्रामीण जनतेच्या मनाला ती फारशी भावत नाही. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेला त्यांना समजेल अशा पध्दतीने करोनाविषयक जनजागृती पथनाटय़ांद्वारे के ली जात आहे.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचवली जात आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, राज्य शासनाने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा, करोना काळात केलेले कार्य, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच शासनाच्या सर्वच विभागांची भूमिका पथनाटय़ाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त कशी राहील, याबाबत जनजागृती आदी बाबींचा पथनाटय़ात समावेश आहे. करोनासंबंधी नियमांचे पालन करून संबंधित पथके  प्रयोग करत आहेत. भारूड, ग्रामीण संवाद, ओव्या, स्थानिक भाषेची लय आदी सर्व बाबींनी परिपूर्ण संहितेचा वापर या प्रयोगासाठी करण्यात आला आहे. २४ जानेवारीपर्यंत विविध तालुक्यांतील गावागावांत बाजारपेठांमध्ये, बस स्थानक तसेच पंचक्रोशीतील महत्त्वाच्या ठिकाणी आठ पथके पथनाटय़ाद्वारे जनजागृती करत आहेत.