परदेशातून शिक्षणासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थिसंख्येत घट अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालातील चित्र

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला. त्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

पुणे : एकीकडे भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असताना परदेशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२०-२१ मध्ये ४८ हजार ३५ परदेशी विद्यार्थ्यांनी भारतातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता, तर २०२१-२२ मध्ये ४६ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला. त्यात विद्याशाखानिहाय प्रवेश, परदेशी विद्यार्थी, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर अशा विविध पद्धतीची आकडेवारी देण्यात आली आहे.

देशभरातील १ हजार १६२ विद्यापीठे, ४२ हजार ८२५ महाविद्यालये आणि १० हजार ५७६ एकल संस्थांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. या अहवालानुसार देशभरातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या ४.३३ कोटी झाली. २०२०-२१ मध्ये ही संख्या ४.१४ कोटी होती. तसेच उच्च शिक्षणातील प्रवेश गुणोत्तरामध्येही वाढ झाली. २०२०-२१ मध्ये २७.३ असलेले प्रवेश गुणोत्तर २०२१-२२ मध्ये २८.४ पर्यंत पोहोचले.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

सर्वेक्षणातील माहितीनुसार, जगभरातील १७० देशांतील ४६ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी भारतातील शिक्षण संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला. त्यात सर्वाधिक ७४.८ टक्के विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व, तर १५.८ टक्के विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. भारतातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी नेपाळ (२८ टक्के) या देशातील आहेत. त्या खालोखाल अफगाणिस्तान (६.७ टक्के), अमेरिका (६.२ टक्के), बांगलादेश (५.६ टक्के), संयुक्त अरब अमिराती (४.९ टक्के), भूतान (३.३ टक्के) या देशांतील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून एकट्या अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत परदेशातून भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अगदीच कमी आहे.

हे वाचले का?  अदानी’आरोपांच्या छायेत आजपासून संसद अधिवेशन; सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक

संगणक अभियांत्रिकीला पसंती

अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सर्वाधिक १२.९ लाख विद्यार्थ्यांनी संगणक अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. त्या खालोखाल सहा लाख विद्यार्थ्यांनी इलेट्रॉनिक्स अभियांत्रिकी, ५.७४ लाख विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, तर ४.६४ लाख विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेत पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, एम.फिल. आणि पीएच.डी. स्तरावर मिळून ४१ लाख ३१ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०२०-२१ च्या तुलनेत प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली. एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यार्थिसंख्या वाढत असताना मेकॅनिकल, स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांमध्ये अनुक्रमे १५.४५ टक्के, ३.३१ टक्के घट झाल्याचे दिसून येते.

हे वाचले का?  Tahawwur Rana Extradiction : २६/११ मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा डिसेंबर अखेरीस भारताच्या ताब्यात?

सरकारी संस्थांमध्ये सर्वाधिक प्रवेश

देशातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७१ लाख विद्यार्थी सरकारी विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये, तर २५ लाख विद्यार्थी खासगी विद्यापीठांमध्ये शिकत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यामुळे खासगी विद्यापीठांपेक्षा सरकारी विद्यापीठांनाच विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते.