पश्चिम वऱ्हाडात पीक कर्ज वाटपाचा बोजवारा

राज्यात दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्हानिहाय पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येते.

अडवणुकीमुळे शेतकरी सावकारांच्या दारी 

अकोला :  पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यांत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीचा अभाव आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात त्यामध्ये कपात करण्यात आली, तर अकोला जिल्ह्यात गेल्यावर्षी एवढेच उद्दिष्ट कायम ठेवण्यात आले, मात्र तरीही पीक कर्ज वाटपाची संथगती व विविध कारणांमुळे शेतकऱ्यांची अडवणूक झाल्याने पीक कर्जाचे १०० टक्के वाटप झालेले नाही. परिणामी, गरजू शेतकऱ्यांना आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सावकारांच्या दारी जावे लागले आहे.

राज्यात दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्हानिहाय पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात येते. कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते; परंतु प्रत्येक जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा कमीच कर्ज वाटप होते. पीक कर्जवाटप बँकांसाठी कायम डोकेदुखीचे ठरते. एकीकडे उद्दिष्टपूर्तीचा दबाव, तर दुसरीकडे शेतकरी खातेधारकांकडून कर्ज परतफेडीत अनियमितता असल्याने बँक अधिकारी कोंडीत सापडतात. पेरणीसाठी पीक कर्जाचा आधार मिळण्याच्या आशेवर शेतकरी वर्ग बँकांमध्ये गर्दी करतात. बँकांचे उंबरठे झिजवून विविध कारणांमुळे पीक कर्ज नाकारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनासुद्धा मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्याचे प्रमाण मोठे आहे. दरवर्षी पीक कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती होत नसल्याने सत्ताधारी, प्रशासन व बँकांवर टीका होते. त्यामुळे यावर्षी अनेक जिल्ह्यांनी पीक कर्जाच्या उद्दिष्टालाच कात्री लावली, मात्र तरीही उद्दिष्टानुसार १०० टक्के पीक कर्जवाटप झालेले नाही.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

१ एप्रिलपासून सुरू झालेल्या पीक कर्जाचे वाटप ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आले. अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ११४० कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. गेल्यावर्षी एवढेच उद्दिष्ट कायम ठेवण्यात आले, मात्र उद्दिष्टपूर्ती करण्यात अपयश आले. जिल्ह्यात १ लाख ०५ हजार ०२८ शेतकऱ्यांना १००२.२३ टक्के कर्ज वाटप करण्यात आले. उद्दिष्ट रकमेच्या ८७.९१ टक्के कर्ज वाटप झाले. बुलढाणा जिल्ह्यात गेल्यावर्षी ३ लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी २४६० कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यावर्षी त्यामध्ये मोठी घट करून १ लाख ४० हजार शेतकऱ्यांसाठी १३०० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. गतवर्षी केवळ १२०० कोटीचे वितरण झाले होते. त्यामुळे यावर्षी १३०० कोटींचे उद्दिष्ट निश्चिात करण्यात आले. मात्र, कर्ज वाटपाचा आकडा यावर्षी आणखी घसरला. खरीप हंगामात शेतकऱ्यांना १०२० कोटींचे कर्ज वाटप झाले. उद्दिष्ट रकमेच्या ७८.४६ टक्के कर्ज वाटप झाले. वाशीम जिल्ह्यातसुद्धा पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाला कात्री लावण्यात आली. गेल्यावर्षी पीक कर्ज वाटपाचे १६०० कोटींचे उद्दिष्ट होते, तर पीक कर्जाचे वाटप केवळ ७५७ कोटींचे झाले होते. त्यामुळे यावर्षी लक्ष्य १०२५ कोटींवर आणण्यात आले. कर्जवाटपासाठी १ लाख ०४ हजार ७९१ शेतकऱ्यांची संख्या ठरविण्यात आली. यावर्षी ९०२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत १४५ कोटीने कर्ज वाटप वाढले. उद्दिष्ट रकमेमध्ये यावर्षी ८८ टक्के कर्ज वाटप झाले, तर अपेक्षित लाभार्थी संख्येचा विचार केल्यास १०० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. 

हे वाचले का?  निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

आता रब्बी हंगामाच्या कर्जाची लगबग 

यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामात पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. खरीपच्या तुलनेत रब्बी हंगामासाठी कर्जवाटपाचे अतिशय कमी उद्दिष्ट असते. अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ७ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ६० कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत त्यातील १११२ खातेधारक शेतकऱ्यांना ८.८१ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात २५० कोटी व वाशीम जिल्ह्यात ७ हजार ३०२ शेतकऱ्यांसाठी ७५ कोटींचे उद्दिष्ट आहे. त्या दोन जिल्ह्यातसुद्धा रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप सुरू आहे.