पाकिस्तानला पाणी पाजलं अन् नौदल दिनाची सुरूवात झाली…

आज भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया आजच्याच दिवशी का साजरा केला जातो नौदल दिन

प्रत्येक देशात लष्कराला वेगळं महत्त्व असतंच, पण समुद्र किनारा असणाऱ्या देशांमध्ये नौदलाचंही तितकंच महत्त्व असतं. भारतासारख्या देशात नौदलाला सतत सतर्क राहावं लागतं. आज (४ डिसेंबर) भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया आजच्याच दिवशी का साजरा केला जातो नौदल दिन…

भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होतो. या साऱ्याला पार्श्वभूमी आहे ती १९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाची. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाईदल सातत्याने घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही त्यात फारसा फरक पडला नव्हता. खरे तर १९७१च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानच्या सततच्या कारवायांनी भारताच्या संयमाचा कडेलोट होणेच केवळ बाकी होते. अशा वेळेस युद्धाच्या निर्णयासंदर्भात बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी खंबीर भूमिका घेत आताचा ऋतू आणि एकूणच परिस्थिती ही आपल्याला परवडणारी नाही, अशी ठाम भूमिका घेतली.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्णयाविरोधात कोणाचीही बोलण्याची शामत नव्हती, अशा कालखंडात सॅम माणेकशॉ यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखवले. खरे तर बांगलादेश युद्धाच्या मुळाशी हा धाडसाचा पाया होता. त्यांनी नोव्हेंबपर्यंत थांबवण्याचा सल्ला दिला, जो मान्य करण्यात आला. तोपर्यंत सैन्याची जुळवाजुळवही व्यवस्थित करता येईल, याची खात्रीही देण्यास ते विसरले नाहीत. अखेरीस इरेस पेटलेल्या पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी ती चूक केलीच. त्यांनी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याच वेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात सागरतळाला धाडण्याची योजनाही पाकने आखली. मात्र तेच लक्षात घेऊन भारतीय नौदलाने चुकीचे संदेश पाठवून ‘पीएनएस गाझी’ची दिशाभूल केली आणि डाव साधला.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर मात्र ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करून लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरून गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तान नौदलाने केलेली नव्हती, किंबहुना तिकडची ताकद पूर्वेकडे वळविण्याचा त्यांचा इरादा होता, पण त्यालाच नौदलाने सुरुंग लावला.

३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या त्या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये दीर्घकाळ केवळ भारतीय नौदलच सामर्थ्यशाली नौदल म्हणून वावरत होते. आज भारताचे नौदल हे शक्तीशाली नौदल म्हणून ओळखले जाते.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?