“पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनेच दहशतवादी भारतात…” लष्करी अधिकाऱ्याचा गंभीर इशारा!

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत.

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून भारतात दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरीचे प्रयत्न केले. मात्र लष्कराने हे सगळे प्रयत्न उधळून लावले आहेत. या वाढत्या घुसखोरीसंदर्भात लष्करातल्या अधिकाऱ्यांनी आता गंभीर इशारा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनेच दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न करत असल्याचं विधान लेफ्टनंट जनरल डीपी पांडे यांनी केलं आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणाले की, दहशतवादी पाकिस्तानच्या लष्करी कमांडर्सच्या संगनमताने भारतात घुसखोरी करत आहेत. काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थिती नियंत्रण रेषेवरील प्रतिनिधींना सहन होत नाही आणि परिणामी, गेल्या एक महिन्यात घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. २३ सप्टेंबरपासून भारतीय लष्कराने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू -काश्मीरच्या उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर लष्कराने घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

“गेल्या 4-5 महिन्यांपासून टेरर लॉन्चपॅड्स भरले आहेत. पण गेल्या एका महिन्यात घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. हे पाकिस्तानी लष्करी कमांडर्सच्या संगनमताने होत आहे”, असे पांडे म्हणाले. अलिकडच्या काळात अनेक प्रयत्न करूनही कोणत्याही दहशतवाद्याने भारतात यशस्वीपणे घुसखोरी केली नाही, असेही ते म्हणाले. लेफ्टनंट जनरल म्हणाले की, भारतीय लष्कर हे प्रयत्न हाणून पाडत असल्याने पाकिस्तान ‘हताश’ होत आहे आणि म्हणूनच, दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत, असे ते म्हणाले.