पावणेपाच लाख विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याचे आव्हान

शहरी भागात इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंत तर ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रत्येक शाळेत दवाखाना उघडणे अवघड; मालेगावमध्ये शिक्षकांचे लसीकरण कमी

नाशिक : दीड वर्षांनंतर शाळांची घंटा पुन्हा एकदा घणघणणार असली तरी शहरी आणि ग्रामीण भागात शासनाच्या नव्या निर्णयानुसार सुरू होणाऱ्या ३ हजार ८० शाळा-महाविद्यालयांतील तब्बल चार लाख ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे आव्हान प्रशासन व शिक्षण संस्थांसमोर आहे. प्रत्येक शाळेत दवाखाना सुरू करणे अवघड असल्याने महापालिकेच्या शाळा पालिका रुग्णालयांशी जोडण्याचे नाशिकच्या वैद्यकीय विभागाने ठरवले आहे. दुसरीकडे इतर भागांच्या तुलनेत मालेगावमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण कमी आहे.

शहरी भागात इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंत तर ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण भागात आठवी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आधीच सुरू झाले आहेत. शहरात इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्रस्ताव करण्याची लगबग सुरू आहे. नाशिक आणि मालेगाव शहरात इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंतच्या एकूण २७८ शाळा-महाविद्यालयात एक लाख ५४ हजार २१९ विद्यार्थी असल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुष्पलता पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या २८०२ शाळांमध्ये तीन लाख सहा हजार ९१४ विद्यार्थी असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

शासनाने शाळा सुरू करताना शक्य असल्यास शाळेतच दवाखाना सुरू करावा आणि या कामात डॉक्टर पालकांची मदत घेण्यास सुचविले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डॉक्टर पालक सापडण्याची फारशी शक्यता नाही. खासगी शाळा, महाविद्यालयात तसे पालक मिळतील. त्यांच्या मदतीने शिक्षण संस्था, शाळांना छोटेखानी दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्याचा पर्याय आहे.  महापालिकेच्या प्रत्येक शाळेत स्वतंत्रपणे दवाखाना सुरू करता येणार नाही. नाशिक मनपाच्या शाळा पालिकेच्या त्या त्या भागातील रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संलग्न करण्यात येतील, असे वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांशी शाळा जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

शिक्षण विभागाने संकलित केलेल्या माहितीनुसार मालेगाववगळता शहरी व ग्रामीण भागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ९० ते ९५ टक्के लसीकरण झालेले आहे. संबंधितांनी किमान पहिली मात्रा घेतलेली आहे. मालेगावमध्ये हे प्रमाण मात्र कमी आहे. याचाही मालेगाव शहरात शाळा सुरू करताना वेगळा विचार करावा लागणार आहे.

शहरातील आठवी ते १२ वीच्या शाळा (विद्यार्थी)

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
  •     नाशिक शहर – २२३ (११०४१७)
  •     मालेगाव शहर – ५५ (४३८०२)

ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा (विद्यार्थी)

  •     जिल्हा परिषद – १०९३ (६७८७१)
  •     खासगी – १७०९ (२३९०४३)