पावसाचा जोर कमी होत नसल्याने गंगापूरमधील विसर्गाचे प्रमाण दुपारी १० हजार क्युसेकपर्यंत वाढविले गेले.
नाशिक : जिल्ह्याच्या निम्म्या भागात पावसाने अक्षरश: कहर केला असून धरणांमधून मोठय़ा प्रमाणात विसर्ग करावा लागल्याने गोदावरीसह दारणा, कादवा, गिरणा, कडवा आदी लहान-मोठय़ा नद्या-नाल्यांना पूर आला आहे. त्र्यंबक शहरासह अनेक भाग जलमय झाले असून काही ठिकाणी रस्ते आणि कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करावी लागली. सप्तश्रृंग गड येथे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने मंदिराच्या पायऱ्यांवर वेगाने आलेल्या पाण्याच्या लोंढय़ात सापडून दोन भाविक जखमी झाले. चांदवडमध्ये पाझर तलावास तडे गेले. पावसाचा जोर कमी होत नसल्याने गंगापूरमधील विसर्गाचे प्रमाण दुपारी १० हजार क्युसेकपर्यंत वाढविले गेले. परिणामी, शहरातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पातळीत कमालीची वाढ होऊन काठालगतच्या भागात, बाजारपेठेत पाणी शिरण्याच्या मार्गावर असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने रविवारी सायंकाळी रौद्र रूप धारण केले. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण या सहा तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या २४ तासात सर्वाधिक २३९ मिलीमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात झाला. पेठ १८७, त्र्यंबकेश्वर १६८ तर इगतपुरी, दिंडोरीत प्रत्येकी १०० आणि कळवणमध्ये ९९ मिलीमीटरची नोंद झाली. पावसाचा परिघ इतरत्र विस्तारत आहे. नाशिकमध्ये ६०, चांदवड ५४, निफाड ४५, बागलाण ३५, येवला ३१, देवळा २९, मालेगाव २५ मिलीमीटरची नोंद झाली. सोमवारी दिवसभर त्याचे झोडपणे कायम राहिल्याने जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले. जलाशय परिचालन प्रणालीनुसार जुलैची पातळी गाठली गेल्याने अनेक धरणांचे दरवाजे एकाच दिवशी उघडले गेले.
दारणा, पालखेडमधून आदल्या दिवशीपासून पाणी सोडले गेले होते. त्यात वाढ करावी लागली. पालखेडमधून २१ हजार ५६०, दारणातून १५ हजार ८०, कडवा ४१५०, चणकापूर २२ हजार ३६९, पुनद ८०८३, ठेंगोडा २० हजार ६४० विसर्ग करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गंगापूर धरणाचे दरवाजे हंगामात प्रथमच उघडले गेले. अवघ्या काही तासात विसर्ग १० हजार क्युसेकपर्यंत वाढवावा लागला. त्यामुळे आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीला पूर आला. दारणा, कादवा, कडवा, गिरणा या नद्यांनाही पूर आला असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.
वरील भागातील बहुतांश धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने नांदूरमध्यमेश्वरमधून ५० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे पाणी शिरल्याने भाविक व व्यावसायिकांची धावपळ उडाली.
सप्तश्रृंग गडावर ढगफुटीसदृश पाऊस
सप्तश्रृंग गडावर दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे मंदिराच्या पायऱ्यांवर पाण्याचा लोंढा आला. त्यामुळे दर्शनासाठी आलेले दोन भाविक खाली पडून किरकोळ जखमी झाले. त्यांना नांदूरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. नागपूर येथील हे भाविक आहेत. ग्रामीण भागातील अनेक रस्ते, कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले आहेत. शिरसगावकडून मुरंबीकडे जाणाला पूल अतिवृष्टीत वाहून गेला. त्यामुळे या गावातील लोकांना गडदेवमार्गे गावठा या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. कादवातील विसर्गामुळे रौळस पिंपरी (पातळी) पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. देवळा तालुक्यातील विठेवाडी पुलावरून गिरणा नदीचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दिंडोरीच्या पश्चिम भागात सहा ते सात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. चांदवड तालुक्यातील जाधववाडी येथे पाझर तलावाच्या भिंतीला तडा गेल्याने आसपासच्या शेतांमध्ये पाणी गेले. जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी धाव घेत उपाययोजना हाती घेतली.