पावसाची उघडीप

जिल्ह्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पावसाने उघडीप घेतल्याने गंगापूरसह अनेक धरणांतील विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले.

गोदावरीच्या पातळीत घट

नाशिक : जिल्ह्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पावसाने उघडीप घेतल्याने गंगापूरसह अनेक धरणांतील विसर्गाचे प्रमाण कमी करण्यात आले. दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीच्या पातळीत बरीचशी घट झाली. पूरपाणी कमी झाल्याने गोदाकाठी येणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. लहानग्यांना घेऊन पाण्यात उभे राहणे, सेल्फी काढणे वा तत्सम प्रकार होत असताना त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

मागील २४ तासांत जिल्ह्यात २७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी गंगापूर, काश्यपी धरण परिसरासह आंबोली भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे तुडुंब भरलेल्या गंगापूरमधून आठ हजार क्युसेकचा विसर्ग करावा लागला. या वेळी शहर परिसरातील पाणी पात्रात मिसळत होते. गोदावरीच्या पातळीत चांगलीच

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

वाढ झाली. या हंगामात गोदावरी प्रथमच पूरस्थितीकडे वाटचाल करत होती. मात्र पावसाने उघडीप घेतल्यानंतर जोर ओसरल्याने विसर्गाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. गुरुवारी गंगापूरमधून ३३१८ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. विसर्ग निम्म्याहून अधिकने कमी झाल्याने गोदावरीची पाणी पातळी कमी झाली.

पाण्याने गोदाकाठावर लावलेल्या फरशांचे नुकसान झाले. काही पाण्यात वाहून गेल्या. गोदावरी काठावर येणाऱ्यांची संख्या दोन दिवसात लक्षणीय वाढली आहे. लहान मुलांना घेऊन नागरिक काठावर पर्यटन करीत आहेत. कुणी मुलांना घेऊन थेट पात्रातही उतरतात. सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरला जात नाही.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

धरणसाठा ८३ टक्क्यांवर

जिल्ह्यातील लहान, मोठय़ा २४ धरणांतील जलसाठा ५४ हजार १८३ दशलक्ष घनफूट म्हणजे ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९५ टक्के होते. सद्य:स्थितीत गंगापूर, काश्यपी, गौतमी, गोदावरी, आळंदी, पालखेड, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, पुनद, माणिकपुंज ही धरणे तुडुंब झाली आहेत. करंजवण (६७ टक्के), ओझरखेड (४९), तिसगाव (३४), मुकणे (७२), भोजापूर (४८), गिरणा (७०) ही सहा धरणे अद्याप भरणे बाकी आहेत. गुरुवारी पूर्ण क्षमतेने भरलेल्या १२ धरणांमधून विसर्ग सुरू होता.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी