पुढच्या महिन्यात करोनाची तिसरी लाट?; SBI च्या अहवालामुळे धास्ती वाढली

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्ण संख्येत कमालीची घट होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचं दिसून येत आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्ण संख्येत कमालीची घट होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचं दिसून येत आहे. देशात लवकरच तिसरी लाट येईल, असा अंदाज एसबीआयने आपल्या अहवालात दिला आहे. करोनाची लाट देशात देशात पुढच्याच महिन्यात येईल असा अंदाज या अहवालात बांधण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात करोना स्थिती बिकट असेल असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रशासनाला आणखी सज्ज राहावं लागणार आहे. तसेच येत्या दिवसात लसीकरणावर जोर द्यावा लागणार आहे.

यापूर्वी एसबीआयने आपल्या अहवालात करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत भाकीत वर्तवलं होतं. त्यानुसार भारतात दुसऱ्या लाटेची स्थिती जाणवली होती. अहवालात ७ मेपासून करोना रुग्णांची संख्या वाढेल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार देशात करोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरु झाली आणि मे महिन्यात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली. या लाटेत दिल्ली, महाराष्ट्र, केरळ या राज्यांना सर्वाधिक झळ पोहोचली. सध्याच्या अहवालानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास १० हजार रुग्ण आढळून येतील. तर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही संख्या वाढलेली असेल, असं एसबीआयच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. तिसऱ्या लाटेचा प्रभाव ९८ दिवसांपर्यंत जाणवेल असं सांगण्यात आलं आहे.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप

दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत सर्वाधिक लोकांना करोनाची लागण होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र दुसऱ्या लाटेइतकी तिसरी लाट गंभीर असेल, याबाबत ठोस सांगता येत नाही. करोनाशी दोन हात करण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम राबवली आहे. याचा फायदा लोकांना होईल. तसेच दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लोकं कमी मरतील असा अंदाज आहे.

देशातली गेल्या २४ तासातली करोना रुग्णांची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. हे आकडे दिलासादायक असल्याने देशातली करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे असं म्हणायला हरकत नाही. देशातल्या करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तर घटतेच आहे. मात्र नवबाधितांची संख्याही कमी कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरात देशात ३९,७९६ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आता ४ लाख ८२ हजार ७१ वर पोहोचली आहे. तर देशातल्या आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ९७ लाख ४३० झाली असून काल दिवसभरात ४२ हजार ३५२ रुग्ण करोनामुक्त झाले.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा