पुन्हा एकदा चिनी कंपनीला कंत्राट; अंडरग्राऊंड ५.६ किमी मार्ग तयार करणार

शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला कंत्राट

दिल्ली-मेरठ आरआरटीएस प्रोजेक्टमधील न्यू अशोक नगर ते शाहिबाबाद मार्गावर जमिनीखालून जाणारा ५.६ किमीचा मार्ग तयार करण्यासाठी एका चिनी कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने (NCRTC) शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीला हे कंत्राट दिलं आहे.

एनसीआरटीसी देशातील पहिली रिजनल रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम उभारत आहे. यावेळी त्यांनी चिनी कंपनीला कंत्राट देताना संपूर्ण प्रक्रिया आणि नियमांचं पालन केलं जात असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

“कंत्राट देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरुन परवानगी घेण्यात आली असून सर्व नियमांचं आणि प्रक्रियेचं पालन करुनच देण्यात आलं आहे. दिल्ली-गाजियाबाद-मेरठ कॉरिडोअरच्या सर्व नागरी कामांचं कंत्राट देण्यात आलं असून वेळेत काम पूर्ण होईल अशा वेगाने बांधकाम सुरु आहे,” अशी माहिती एनसीआरटीसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.

गतवर्षी जून महिन्यात शांघाई टनल इंजिनिअरिंग कंपनीची बोली सर्वात कमी असल्याचं समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. लडाखमधील सैन्य संघर्षामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच हे कंत्राट चिनी कंपनीला देण्यावरुन हा वाद होता. ८२ किमी लांबीच्या दिल्ली-गाजियाबाद-मेरठ आरआरटीस कॉरिडोअरला एशियन डेव्हलपमेंट बँक फंडिंग करत आहे.