पुरेसं संख्याबळ असताना अजित पवारांची गरज का लागली? देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा; म्हणाले, “शरद पवारांनी…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युलाही सांगिताल.

विरोधी बाकावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून नवं सरकार स्थापन केलं. सत्तास्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ असतानाही त्यांनी अजित पवारांनाही आपल्यासोबत घेतलं. अजित पवारांना महायुतीत घेण्यामागंच राजकीय समीकरण काय? याबात देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात खुलासा केला आहे.

अजित पवार यांना बरोबर घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील आमचे नेते व कार्यकर्ते सुरुवातीला नाराज झाले होते. पण त्यांची महिनाभरात समजूत काढण्यात यश आले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असे पुरेसे संख्याबळ असताना अजित पवारांची आवश्यकता का भासली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शरद पवार यांनी विरोधकांची मोट बांधून भाजपाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अशा वेळी आम्हालाही रणनीती आखावी लागली. राष्ट्रवादीत आपल्याला काही भवितव्य नाही याची अजित पवारांना खात्री झाली होती. आम्हालाही ताकद वाढवायची होती. त्यातूनच अजित पवार आमच्याबरोबर आले. शेवटी आम्हालाही राजकारण करायचे आहे. अजित पवार बरोबर आल्याने पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद वाढली, असे फडणवीस यांनी सांगितले. सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर भाजपाने आरोप केले होते हे अगदी बरोबर. पण यंत्रणांना त्यांचा थेट सहभाग कुठे आढळला नव्हता, असा दावा फडणवीस यांनी केला.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

शेवटी मतांचे गणित महत्त्वाचे

राजकारणात रासायनिक समीकरण (पॉलिटिकल केमिस्ट्री) तसेच मतांचे गणित (अॅरेथमॅटिक्स) महत्त्वाचे असते. आम्ही रसायनांत मजबूत होतो पण गणिताची खात्री नव्हती. म्हणूनच मतांचे गणित जुळविण्यासाठी पक्षाची ताकद वाढवावी लागते. मग नवीन मित्र जोडावे लागतात. याचाच भाग म्हणून अजित पवार किंवा राज ठाकरे यांच्याशी आम्ही मैत्री केली. याचा आम्हाला निवडणुकीत नक्कीच फायदा होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

राज्यात तीन पक्षांची महायुती किंवा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमुळे काहीसा गोंधळ झाला. पण मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून द्यायचे हा जनतेने निर्धार केला असल्याने महायुतीला चांगलेच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय?

जागावाटपात लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी केली जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अ़डचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. मात्र ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असे सूत्र असेलच, हे सांगता येणार नाही. आताही भाजपचे ११५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !