“पोलीस हप्ते घेत आहेत आणि गुन्हेगारीकडे…”, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात आणि आजूबाजूच्या दोन-तीन तालुक्यांमध्ये शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज तारांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे ‌.

याबाबतच्या पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी दाखल झालेल्या आहेत, पोलीस नेहमीच सांगतात की आम्ही चौकशी करीत आहोत, परंतु यामध्ये सामील असणाऱ्यांना पोलीस मात्र प्रामाणिकपणे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत, पोलीस आणि पोलीस अधिकारी फक्त हप्ते घेण्यामध्ये व्यस्त असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

शेतीसाठी जी वीज वापरली जाते त्याच्याच तारा, वायर चोरीला जात असल्याने शेतीचं नुकसान होतं आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे. पोलीस नुसतंच सांगत आहेत की आम्ही तपास करतो आहोत. मात्र यात जे कुणी सामील आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस कारवाई करताना दिसत नाही. मुक्ताई नगरमध्ये सट्टा, मटका, जुगार यांचे अड्डेही सुरु आहेत. पोलिसांना हप्ते घेण्यातच जास्त रस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष देण्याची गरज आहे. छोटे मिया तो छोटे मिया बडे मियाँ सुभान अल्ला अशी पोलीस खात्याची स्थिती आहे असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

सध्या शेतकऱ्यांची कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यासाठी पाणी जास्त वेळ उपलब्ध असावं लागतं. नाहीतर शेतीचं नुकसान होतं. त्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांवर हप्ते घेत गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.