प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी

स्मार्ट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर थविल यांची पाच वर्षांपूर्वी नियुक्ती झाली होती.

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

नाशिक : शहरातील स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. मध्यवर्ती भागातील खोदकाम, रखडलेली कामे, मनमानी कारभार आदींवरून सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी थविल यांच्यावर ताशेरे ओढले होते. कंपनीचे अध्यक्ष त्यांना पाठिशी घालत असल्याचे आरोप महापालिकेच्या सभेत झाले.  शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी थविलांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप नोंदविले.

स्मार्ट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर थविल यांची पाच वर्षांपूर्वी नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळातील स्मार्ट सिटी कंपनीचे प्रत्येक काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. तब्बल २० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या स्मार्ट रस्त्यापासून ते अगदी अलिकडच्या काळात पावसाळी गटार योजना व अन्य कामांसाठी झालेल्या खोदकामाचे वारंवार पडसाद उमटले. अलीकडेच सर्वसाधारण सभेतही थविल यांच्या मनमानी कारभारावर सर्वपक्षीयांकडून संताप व्यक्त झाला होता. खुद्द महापौरांनी स्मार्ट सिटी कंपनी जणू वैयक्तिक कंपनी असल्याच्या थाटात ते अतिशय वाईट पध्दतीने कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी आणि तत्परतेने बदली करावी, असा ठराव मंजूर केला होता. स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारावर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या विशेष सभेत थविल यांनी दांडी मारली होती. स्मार्ट योजनेतील कामांमुळे मध्यवर्ती भागात खोदकाम झाले आहे. कंपनीचे अधिकारी व कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशीची मागणी केली गेली. वर्षभरापूर्वी थविल यांची बदली करण्याचा ठराव झाला होता. तथापि, तेव्हा बदली झाली नव्हती. यावेळी कंपनीचे अध्यक्ष त्यांना पाठिशी घालत असल्याचे आरोप करण्यात आले होते. थविल यांनी मुंबईत जाऊन राज्याचे मुख्य सचिव तथा स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्यासमोर आपली बाजू मांडल्याचे सांगितले जाते. शासकीय नियमानुसार तीन वर्षांनंतर बदली केली जाते. उपजिल्हाधिकारी थवील यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर एक वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर ते पाच वर्ष कार्यरत राहिले.

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

थविल यांच्या जागी सुमंत मोरे यांची नियुक्ती

शहरातील स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी विषय पत्रिकेवर चर्चा करण्याआधी थविल यांच्या मनमानी कारभारावर चर्चा करावी, अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. केंद्र सरकारच्या चांगल्या योजनेची वाट लावण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला. गुरूमित बग्गा यांनी महापौरांच्या मागणीचे समर्थन केले. परंतु, कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांनी विषय पत्रिकेतील विषय झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे मान्य केले. बैठकीच्या अखेरीस कुंटे यांनी महापौरांना थविल यांची बदली झाल्याची माहिती देत या विषयावर पडदा टाकला.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध