प्रादेशिक शांततेसाठी पूरक भूमिका! शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया

रशियाला रवाना होण्यापूर्वी, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यासाठी भारताला पूरक भूमिका बजावायची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली/मॉस्को : भारत आणि रशियादरम्यानचे संबंध अधिक सुदृढ झाल्यास त्याचा दोन्ही देशांच्या जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. मोदी यांचा दोन दिवसांचा रशिया दौरा सोमवारपासून सुरू झाला. रशियात दाखल झाल्यानंतर मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची मॉस्कोतील प्रेसिडन्ट हाऊस येथे भेट घेतली. रशियाला रवाना होण्यापूर्वी, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यासाठी भारताला पूरक भूमिका बजावायची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

तत्पूर्वी रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मन्टुरोव्ह यांनी विमानतळावर मोदी यांचे स्वागत केले. त्यांना तिथे सैनिक सलामी देण्यात आली. त्यानंतर मन्टुरोव्ह मोदींबरोबर एकाच वाहनामधून त्यांच्या हॉटेलपर्यंत गेले. तिथे हिंदी गीते गाणाऱ्या रशियन कलाकारांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.

मंगळवारी मॉस्कोमध्ये २२वी भारत-रशिया शिखर परिषदेत दोन्ही नेते सहभागी होतील. मोदी आणि पुतिन यांच्या शिखर परिषदेमध्ये व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक वाढवण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. तसेच रशिया-युक्रेन संघर्षाचा मुद्दाही उपस्थित होण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

भारताने अद्याप रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केलेला नाही. रशियाच्या सैन्यामध्ये साहाय्यक कर्मचारी म्हणून भारतीयांची भरती थांबवावी, तसेच रशियन सैन्यामध्ये अद्याप कार्यरत असलेल्या भारतीयांना मायदेशी परत पाठवण्याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती मोदी करण्याची अपेक्षा आहे. ९ जुलैला मोदी ऑस्ट्रियाला जाणार आहेत.

भारतीयांना सुरक्षित परत आणणार का?

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यात युक्रेनविरोधातील युद्धामध्ये रशियाच्या सैन्यासाठी लढणाऱ्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित करणार का आणि त्यांना सुरक्षित परत आणण्याची खबरदारी घेणार का, असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. मोदींनी युद्ध थांबवल्याचा मोठा प्रचार करण्यात आला होता, याचा उल्लेख काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर केला.