प्रायोगिक धडपडीतून रंगभूमीला डिजिटल उभारी

करोनाच्या संकटामुळे राज्यातील रंगभूमीवरची चळवळ थंडावली असताना पुणे, मुंबई, नाशिकमधील काही रंगकर्मीनी यावर मात करत ऑनलाइन माध्यमाचा वापर करत ‘डिजिटल प्रायोगिक धडपड’ सुरू केली आहे. १८ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नाटय़ महोत्सव भरविण्यात येणार आहे. २० ऑक्टोबपर्यंत रात्री आठ वाजता हा महोत्सव संकेतस्थळावर सुरू राहणार आहे.

करोनाकाळात अनेक उद्योग-व्यवसायांसह मराठी रंगभूमीलाही मोठा फटका बसला आहे. रंगमंचामागे वावर असणाऱ्या तंत्रज्ञांना फटका बसला. व्यावसायिक रंगभूमी ठप्प झाली. अडचणींची ही शर्यत कलावंतांनी पार करत ऑनलाइन नाटय़ महोत्सवाची तयारी सुरू के ली आहे. १८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात पुण्याचे नाटकघर निर्मित रामू रामनाथन दिग्दर्शित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘शब्दांची रोजनिशी’ नाटक पाहायला मिळणार आहे. काही गोष्टी अनाकलनीय, अतक्र्य, अघटित असतात. त्या मनोरंजन करतात आणि क्लेश देतात. याच कथांची अनुभूती शब्दांची रोजनिशीमध्ये आहे. केतकी थत्ते आणि अतुल पेठे यांच्या भूमिका आहेत. १९ ऑक्टोबर रोजी डॉ. आशुतोष दिवाण लिखित आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘घटोत्कच’मध्ये महाभारतातील घटोत्कच या व्यक्तिरेखेला समकालीन वास्तवाची अदृश्य किनार देत राजकीय पक्षांच्या कार्यात जीव तोडून काम करणाऱ्या आणि शेवटी डावलल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांत एक घटोत्कच असतो हे अधोरेखित करण्यात आले आहे. राहुल शिरसाठ, हरीश भिसे, अभिनय तालखेडकर, राजन पंधे, ॠचिका खैरनार, श्रेयसी वैद्य यांच्या भूमिका आहेत. महोत्सवाचा समारोप २० रोजी नाशिकचे प्रमोद गायकवाड निर्मित, दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘हंडाभर चांदण्या’ने होणार आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोटय़ा दुष्काळी गावातील ही विलक्षण गोष्ट आहे. यामध्ये प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, दीप्ती चंद्रात्रे, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

नाशिककर कलाप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तसेच ऑनलाइन तिकिटासाठी ९९६७६९९९५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.