“फक्त ११ लाखांसाठी त्रास दिला जातोय…”, संजय राऊतांच्या अटकेवर जया बच्चन यांची संतप्त प्रतिक्रिया

“संजय राऊतांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे,” असेही जया बच्चन म्हणाल्या

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. याप्रकरणी त्यांना तीन दिवसांची म्हणजेच ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. संजय राऊतांना ई़डीने अटक केल्यानंतर विविध स्तरावरुन यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नुकतंच याप्रकरणी अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना जया बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर आरोप केले

जया बच्चन यांनी नुकतंच संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. सध्या ट्वीटरवर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊतांना केलेली अटक याबद्दल बोलताना दिसत आहेत. ‘संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्न जय बच्चन यांना विचारण्यात आला.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

त्यावर त्या म्हणाल्या, “नक्कीच. आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.” यापुढे त्यांना संजय राऊतांच्या आईबद्दल विचारण्यात आले. ‘राऊत यांची आई खूप म्हातारी आहे.’ त्यावर त्यांनी ‘हो मला माहिती आहे’, असे म्हटले.

यापुढे त्यांना ‘ईडीचा हा अशाप्रकारे सुरु असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते’, असे विचारण्यात आले. त्यावर जया बच्चन यांनी “२०२४ पर्यंत” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

हे वाचले का?  AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. रविवारी (३१ जुलै) ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. तर दुसरीकडे काहीही केले तरी मी शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेना सोडणार नाही. मी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी ट्वीटमार्फत दिली.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना सोमवार १ ऑगस्ट ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. या सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली आहे.