फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला; डॉ. तात्याराव लहाने यांचा गौप्यस्फोट

महाआघाडीच्या सरकारमध्ये मिळाला न्याय

फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला, असा खळबळजनक आरोप प्रसिद्ध नेत्रतज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला आणि काम करायला संधी मिळाली, अशी कबुलीही त्यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी (ता. नेवासा) येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उदयन गडाख, इंदोरीकर महाराज आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

डॉ. लहाने म्हणाले, “मागील सरकारने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकारमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी माझी बाजू मांडून मला शासनस्तरावर काम करण्याची संधी दिली.” मुंडे यांना चांगल्या कामांसाठी आपला पाठींबा आहे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

नेत्रतज्ज्ञ असलेल्या डॉ. लहाने यांनी यावेळी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना लहान मुलांना काजळ घालू नये, असे सांगितले. दरम्यान, गाजर, पपई व शेवग्याची शेंग प्रमाणात खावी असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

जातीवर गावाचे नाव नसावे – धनंजय मुंडे

जातीवर एखाद्या गावाचे नाव असणे हे आपल्याला शोभणारे आणि परवडणारेही नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन आपल्या गावांची नावं ही जाती आधारित न ठेवता संत, महामानवांच्या किंवा महापुरुषांच्या नावाने ठेवावीत, अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.