फरारी डॉ. झनकर यांच्याकडे कोटय़ावधींची मालमत्ता

लाच स्विकारल्यानंतर फरार झालेल्या डॉ. वीर-झनकर यांचा अद्याप छडा लागलेला नाही.

कल्याण-सिन्नरमध्ये जमीन, चार सदनिका, महागडी गाडी

नाशिक : शाळांच्या अनुदान प्रस्तावाचा कार्यादेश काढण्यासाठी आठ लाख रुपये स्विकारणाऱ्या जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्याकडे कोटय़वधींची मालमत्ता असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. यामध्ये कल्याण येथे दोन आणि नाशिक शहरात दोन अशा एकूण चार सदनिका, कल्याण तसेच सिन्नर येथे सुमारे तीन एकर जमीन, होंडा सिटीसारखी अलिशान कार आदींचा समावेश आहे.

लाच स्विकारल्यानंतर फरार झालेल्या डॉ. वीर-झनकर यांचा अद्याप छडा लागलेला नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पथकाने मंगळवारी येथे आठ लाख रुपयांची लाच स्विकारतांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वीर-झनकर यांच्यासह त्यांच्या शासकीय वाहनाचा चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना ताब्यात घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांना अंधार पडल्यावर अटक करता येत नसल्याने झनकर यांना अटक न करता समन्स बजावत सकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याविषयी सांगण्यात आले होते. परंतु, त्या गायब झाल्या.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

या घटनाक्रमामुळे तपास यंत्रणेविषयी संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फरार झालेल्या झनकर यांचा अद्याप तपास लागलेला नाही. लाचखोरीच्या या घटनेने शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश पडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांकडील बेहिशेबी मालमत्तेचा शोध सुरू केला आहे.

फरार डॉ. झनकर यांच्या घराची झडती घेतली गेली. यावेळी विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे आणि ४० हजार रुपयांची रोकड आढळली. यात डॉ. झनकर यांच्या नांवावर गंगापूररोड आणि शिवाजीनगर तसेच कल्याण रस्त्यावरील मुरबाड येथे आणि मौजे कंधारे येथे प्रत्येकी एक अशा एकूण चार सदनिका असल्याचे उघड झाले. याशिवाय सिन्नर तसेच कल्याणमध्ये काही गुंठे जमीन नावावर आहे. सर्व मिळून जवळपास तीन एकर जमीन त्यांच्या नावावर असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. होंडा सिटी कार, अ‍ॅक्टिव्हा आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, सिटी युनियन बँक, पंजाब नॅशनल बँकेत त्यांची खाती आहेत.

हे वाचले का?  नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

या प्रकरणातील दुसरा संशयित शासकीय वाहनचालक येवले यांच्या घरातून विविध बँकांतील खात्यांची पुस्तके, दोन वाहनांचे नोंदणी पुस्तक तर तिसरा संशयित दशपुते याच्याकडे सदनिका, दोन दुचाकी, तीन बँकांमध्ये खाते आढळली. डॉ. झनकर यांच्याकडे कोटय़वधीची मालमत्ता आढळली असली तरी ती बेहिशेबी मालमत्ता आहे की नाही याची छाननी अद्याप झालेली नसल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले.