फुलांनी सजवलेल्या एसटीने पांडुरंग ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीसाठी आळंदीला रवाना

फुलांनी सजविलेल्या तीन एसटी बस आळंदीकडे रवाना

 मंदार लोहोकरे, पंढरपूर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यासाठी पंढरपूरहून परमात्मा श्री पांडुरंग, भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज यांच्या पादुका आळंदीकडे रवाना झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी फुलांनी सजविलेल्या तीन स्वतंत्र एसटी बसने आळंदीकडे प्रस्थान ठेवले आहे. प्रत्येक बसमध्ये फक्त २० जण असून सर्वांची करोना चाचणी करण्यात आली आहे. आजचा एकादशी सोहळा १३ तारखेला संजीवन समाधी सोहळा करून पंढरीला माघारी येईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी,कार्तिकी आणि आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महराजांची संजीवन सोहळ्यावर सावट आणि नियंत्रित लोकात साजरा केला जात आहे. आळंदी वारीसाठी पंढरपूरहून श्री विठ्ठल, भक्त पुंडलिक आणि संत नामदेव महाराज यांच्या पादुका दरवर्षी जात असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा दिवशी साक्षात परमात्मा पांडुरंग त्यांना भेटायला गेले होते. तसेच संत नामदेवराय आणि भक्त पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी आळंदीकडे प्रस्थान ठेवत असत. मात्र, यंदा करोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला निघाल्या आहेत. साधारण पाच महिन्यापूर्वी झालेल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी यंदा करोनामुळे सर्व संत एसटीने पंढरपूरला आले होते. त्यानंतर आता विठ्ठलालाच एसटीने माऊलीच्या भेटीसाठी आळंदीला जावे लागले आहे.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा

शुक्रवारी सकाळी विठ्ठलाच्या पादुका एसटीने आळंदीला निघाल्या. या पादुका दुपारी दोन वाजेपर्यंत आळंदी येथे पोहोचतील. त्यानंतर पुढे दोन दिवसाचा आळंदी येथे पादुकांचा मुक्काम असणार आहे. त्रयोदशीला अर्थात १३ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा दिवशी विठ्ठलाची आणि माऊलीची भेट होईल.त्यानंतर या पादुका परत एसटीनेच पंढरपूरला परततील.

विठ्ठलाच्या पादुकांसमवेत एसटीने मंदिर समितीचे सदस्य नित्योपचार विभागातील पुजारी आणि सुरक्षारक्षक असे २० तसेच भक्त पुंडलीकासमवेत ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर व इतर २० आणि संत नामदेव महाराज यांच्या समवेत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास व इतर २० जण आळंदीकडे रवाना झाले आहेत. या सर्व व्यक्तींच्या कोरोना तपासण्या करून त्यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर