फॉक्सकॉन-वेदान्तचा काडीमोड, भारतातील महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प धोक्यात

इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीतील अग्रणी तैवानस्थित ‘फॉक्सकॉन’ कंपनीने अखेर उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या ‘वेदान्त लिमिटेड’बरोबर सेमिकंडक्टर चिपनिर्मितीच्या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीतील अग्रणी तैवानस्थित ‘फॉक्सकॉन’ कंपनीने अखेर उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या ‘वेदान्त लिमिटेड’बरोबर सेमिकंडक्टर चिपनिर्मितीच्या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले. यासाठी फॉक्सकॉनने कोणतेही विशिष्ट कारण दिले नसले तरी भागीदारी संपुष्टात आल्याने आधी महाराष्ट्रात नियोजित असलेला आणि ऐन वेळी गुजरातकडे वळविलेला हा प्रकल्प धोक्यात आला आहे.

जगातील सर्वात मोठी काँट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक उत्पादक असलेली फॉक्सकॉन आणि वेदान्त यांनी गेल्या वर्षी गुजरातमधील ढोलेरा येथे सेमिकंडक्टर चिपनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी १९.५ अब्ज डॉलर (सुमारे दीड लाख कोटी रुपये) गुंतवणुकीसाठी करार केला होता. उभय कंपन्यांनी धोरणात्मक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची निवड केली होती; पण आकस्मिकपणे प्रकल्प गुजरातमध्ये साकारत असल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे गुजरातला देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील मुख्य केंद्र बनविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र सोमवारी फॉक्सकॉनने एका निवेदनाद्वारे आपली वेदान्तबरोबर भागीदारी संपुष्टात आल्याचे जाहीर केले. ‘आता वेदान्तकडे पूर्ण मालकी असलेल्या कंपनीच्या या प्रकल्पातून अंग काढून घेण्यासह त्याच्याशी जुळलेले फॉक्सकॉनचे नावही काढून टाकण्यासाठी आम्ही पाऊल टाकत आहोत. फॉक्सकॉनचा या प्रकल्पाशी कोणताही संबंध राहिलेला नाही, परिणामी त्याचे मूळ नाव तसेच ठेवले गेल्यास भविष्यातील भागधारकांसाठी ते संभ्रम निर्माण करणारे ठरेल,’ असे या निवेदनात म्हटले आहे. त्याच वेळी भारताच्या सेमिकंडक्टर क्षमतेच्या विकासाच्या दिशेने प्रयत्नांच्या सफलतेबाबत फॉक्सकॉनने विश्वास व्यक्त केला आहे. या घडामोडींवर वेदान्तकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नसल्याचे ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. मूळ करारानुसार, वेदान्तच्या चिपनिर्मिती क्षेत्रातील महत्त्वाकांक्षेत तांत्रिक भागीदार म्हणून फॉक्सकॉनचा या संयुक्त उपक्रमात सहभाग केला होता आणि प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या वेदान्तकडे ६० टक्के हिस्सेदारी तर उर्वरित ४० टक्के मालकी फॉक्सकॉनकडे राहणार होती. दरम्यान, फॉक्सकॉन आणि वेदान्त यांच्यात काही मुद्दय़ांवर आधीपासूनच मतभेद असल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या सेमिकंडक्टर मोहिमेंतर्गत प्रोत्साहनपर सवलतींसाठी पुन्हा अर्ज करण्यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये मतभेद होते. संयुक्त कंपनीने यासाठी मागील वर्षी केलेला अर्ज केंद्राने अद्याप मंजूर केलेला नाही.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

विरोधकांचे आरोप काय होते?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना वेदान्त-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती. पुण्याजवळीत तळेगावची जागाही निश्चित झाली होती. मात्र दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले आणि हा प्रकल्प गुजरातमध्ये होत असल्याचे जाहीर करण्यात आले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्राने अधिक सवलती देऊनही केंद्र सरकारच्या दबावामुळे प्रकल्प गुजरातला नेत्याचा आरोप काँग्रेससह सर्व विरोधकांनी त्या वेळी केला होता.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

कारण काय?

चिपनिर्मितीसाठी फॉक्सकॉनच्या बरोबरीने गेल्या वर्षी स्थापन केलेल्या या संयुक्त उपक्रमाची संपूर्ण मालकी घेत असल्याचे वेदान्त समूहाने गेल्या शुक्रवारी जाहीर केले. परिणामी ‘वेदान्त फॉक्सकॉन सेमिकंडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या भागीदारी उपक्रमाला आता वेदान्त समूहाच्या पूर्ण मालकीच्या ‘ट्विन स्टार टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ची उपकंपनी म्हणून स्वरूप प्राप्त होईल. या नव्या रचनेमुळे देशात सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले व्यवसायातील वेदान्त ही पहिली भारतीय कंपनीही ठरेल, अशी घोषणाही कंपनीकडून करण्यात आली होती. हीच बाब दोन भागीदारांमध्ये फुटीचे कारण बनल्याचे समजते.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

घटनाक्रम

’१४ फेब्रुवारी २०२२ – सेमिकंडक्टर निर्मितीसाठी फॉक्सकॉनचा वेदान्तबरोबर कराराची घोषणा
’१३ सप्टेंबर – १९.५ अब्ज डॉलर गुंतवणुकीचा उभय कंपन्यांमध्ये करार
’१९ मे २०२३ – वेदान्त-फॉक्सकॉन भागीदारीत अडचणी असल्याचे माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांचे सूतोवाच
’३१ मे – करारातील
अटींवरून झालेली कोंडी फुटत नसल्याचे वृत्त
’३० जून – प्रसिद्धीपत्रकावरून ‘सेबी’कडून वेदान्तला दंड
’१० जुलै – करारातून
बाहेर पडत असल्याची फॉक्सकॉनची घोषणा