बांधकाम व्यावसायिक अवर्सेकरांवर गुन्हा दाखल; अनेक बँकांची ३८४७ कोटींची फसवणूक

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)सह इतर १५ बँकांचे सुमारे तीन हजार ८४७ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) युनिटी इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेड आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)सह इतर १५ बँकांचे सुमारे तीन हजार ८४७ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) युनिटी इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेड आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आगीने नुकसान झालेल्या मंत्रालयाच्या इमारतीचे नुतनीकरणही याच बांधकाम व्यावसायिकाकडून करण्यात आले होते.

गेल्या १७ ऑगस्ट रोजी ‘एसबीआय’कडून याप्रकरणी लेखी तक्रार करण्यात आली होती. प्रथम माहिती अहवालानुसार, ‘सीबीआय’ने याप्रकरणी युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड, तिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किशोर अवर्सेकर, उपाध्यक्ष अभिजीत अवर्सेकर, कार्यकारी संचालक आशिष अवर्सेकर आणि संचालक पुष्पा अवर्सेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कलानगर येथील ठाकरे कुटुंबियांचा मोतोश्री बंगला, दादर टीटी उड्डाणपूल आणि सीएसएमटी येथील भुयारी मार्गाचे बांधकाम केले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत अभिजित अवर्सेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हे वाचले का?  ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

आरोपींनी अज्ञात लोकसेवक आणि अज्ञात व्यक्तींच्या मदतीने गुन्हेगारी कट रचून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांच्या समूहांची तीन हजार ८४७ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कंपनीने एसबीआय आणि इतर बँकांकडून विविध सुविधांद्वारे कर्ज घेतले होते. ते बुडीत निघाल्यामुळे बँकांचे सुमारे ३,८४७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर बँकांकडून याप्रकरणी न्यायवैद्यक लेखापरिक्षण करण्यात आले. त्यातून फसवे व्यवहार केल्याचे, चुकीची माहिती देण्यात आल्याचे उघड झाले. तसेच इतर खात्यांमध्ये रक्कम वळवण्यात आल्याचे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले. त्यानुसार ‘एसबीआय’च्यावतीने उपमहाव्यवस्थापक रजनी ठाकूर यांनी ‘सीबीआय’कडे तक्रार केली. तिची ‘सीबीआय’ने प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणी कट रचणे, फसवणूक करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

संस्थेचा कार्येतिहास.. 

  • कलानगर येथील ठाकरे कुटुंबीयांच्या मोतोश्री बंगल्याचे नूतनीकरण.
  • दादर टीटी उड्डाणपूल आणि सीएसएमटी येथील भुयारी मार्गाचे बांधकाम.
  • आगीत नुकसान झालेल्या मंत्रालयाच्या इमारतीचे नुतनीकरण.