बाजारपेठेत प्रवेशासाठी आता

पाच रुपये शुल्क गर्दी नियंत्रणासाठी एकच प्रवेशद्वार

पाच रुपये शुल्क गर्दी नियंत्रणासाठी एकच प्रवेशद्वार

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बाजारपेठांमधील गर्दी कमी होत नसल्याने शहर पोलिसांनी बाजारपेठांना प्रतिबंधित करून गर्दी नियंत्रित करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या बाजारपेठा बंदिस्त करून ये-जा करण्यासाठी एकच मार्ग ठेवला जाईल. खरेदीसाठी येणाऱ्यास पाच रुपये शुल्क द्यावे लागेल. तासाभरापेक्षा अधिक काळ कुणी रेंगाळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. बाजारपेठेत ये-जा करण्याचा एकच मार्ग राहणार असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. शिवाय, अनावश्यक गर्दी रोखली जाईल असे नियोजन करण्यात आले आहे.

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. मध्यंतरी अंशत: टाळेबंदी लागू केली गेली. परंतु, व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. दुकानांसाठीची वेळमर्यादा पाळली जात नाही. हॉटेल, खाद्यगृहात सुरक्षित अंतराचा विसर पडतो. मुखपट्टी परिधान केली जात नाही. बाजारपेठांमधील गर्दी ओसरलेली नाही. नियमभंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईचे सत्र राबविले जात आहे. या स्थितीत करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात अलेला नाही.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर, बाजारपेठांमधील गर्दी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये अधिसूचना काढली आहे. त्या आधारे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्त्वाच्या बाजारपेठा, भाजी बाजार तसेच तत्सम ठिकाणची गर्दी रोखण्यासाठी अशा ठिकाणी प्रवेश नियंत्रित केला जाणार आहे. गर्दी होणाऱ्या बाजारपेठा प्रतिबंधित करून ये-जा करण्यासाठी एकच मार्ग ठेवला जाईल. या संदर्भात पोलीस उपायुक्त विजय खरात, साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, महापालिकेचे विभागीय अधिकारी यांची सोमवारी सकाळी बैठक झाली. अंबड, सातपूर, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवननगर, अशोकनगर, कलानगर हे बाजार चारही बाजूने बंदिस्त करून ये-जा करण्यासाठी एकच प्रवेशद्वार ठेवले जाणार आहे. तिथे येणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये शुल्क भरून पावती घ्यावी लागेल. बाजारपेठेत किती लोक गेले याची माहिती प्रवेशद्वारावर राहील. जेणेकरून तिथून गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्याला एक तासाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यापेक्षा कोणी अधिक वेळ रेंगाळल्यास त्यावर दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर, सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महत्त्वाच्या, जास्त गर्दी होणाऱ्या बाजारपेठा प्रतिबंधित करून ये-जा करण्यासाठी एकच मार्ग ठेवला जाईल. प्रवेशद्वारावर नागरिकांना प्रवेश शुल्क पावती घेऊन आतमध्ये प्रवेश करता येईल. तासाभरापेक्षा अधिक काळ कुणी बाजारपेठेत रेंगाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. अनावश्यक गर्दी टाळली जाईल. दंडाची रक्कम महापालिकेची यंत्रणा वसूल करेल. या निधीचा उपयोग बाजारपेठेतील स्वच्छतेसाठी केला जाईल.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

– विजय खरात (पोलीस उपायुक्तनाशिक)