बिटको रुग्णालयातील स्वच्छतागृहात मृतदेह दोन तास पडून

नाशिक रोड येथील बिटको महापालिका रुग्णालयातील स्नानगृहात ५१ वर्षांच्या करोनाबाधिताचा मृतदेह दोन तास पडून राहिल्याची धक्कादायक घटना घडली.

नाशिक : नाशिक रोड येथील बिटको महापालिका रुग्णालयातील स्नानगृहात ५१ वर्षांच्या करोनाबाधिताचा मृतदेह दोन तास पडून राहिल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा ठळकपणे उघड झाला आहे.

मालेगाव येथील चिंतामण मोरे (५१) यांच्यावर बिटको रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरील औषध विभागातील कक्षात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते सर्वासाठी असलेल्या स्वच्छतागृहात गेले. त्यांच्या हातात पाण्याची बाटलीही होती. त्या वेळी अचानक शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने चक्कर येऊन ते तेथेच कोसळले. दोन तासांपेक्षा अधिक वेळ त्यांचा मृतदेह तेथेच पडून होता. हा प्रकार अन्य लोकांच्या लक्षात येऊनही त्यांना उचलण्यासही कुणी धजावत नव्हते. थोडय़ा वेळाने कर्मचारी आल्यावर त्यांनी मृतदेह उचलला. या घटनेमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिटको रुग्णालयात स्वच्छतागृह, मोकळ्या जागेत याआधीही असे मृतदेह पडून राहिल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान

बिटको रुग्णालयातील मृत्युदर वाढत आहे. या ठिकाणी रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असताना त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगारांची संख्या अपुरी आहे. पंतप्रधान योजनेतील सुमारे शंभर यंत्रे धूळ खात खोलीत पडून आहेत. अशी यंत्रे, साधने त्वरित उपयोगात आणली जात नाहीत.

एकाच उद्वाहकातून करोना रुग्ण, मृतदेह, कर्मचारी यांची वाहतूक होते. रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला उचलण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन त्वरित हालचाल करत नाही. यामुळे येथील रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होत असून महत्त्वाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

हे वाचले का?  सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

रुग्णालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य असून वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. घाण तसेच दरुगधीमुळे

रुग्णांसह अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काम करताना असणारा कमालीचा धोका, कामाचा जादा ताण आणि सहा महिन्यांपासून पगार नसणे, यामुळे कर्मचाऱ्यांचेही मनोबल खालावत आहे.

या पाश्र्वभूमीवर, महापालिका आयुक्तांनी पूर्वसूचना न देता बिटको रुग्णालयाची आठवडय़ातून एकदा पाहणी करावी, त्रुटी दूर कराव्यात, रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवावा, खासगी रुग्णालयांना चाप बसण्यासाठी रुग्ण हक्क सनद जारी करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.

बिटको रुग्णालयात ७०० रुग्णांसाठी एकच फिजिशियन आहे. त्यामुळे वेळेत योग्य निदान आणि उपचार न होणे, हे मृत्युदर वाढीचे प्रमुख कारण आहे. फिजिशियन, डॉक्टर, परिचारिकांची संख्या तातडीने वाढवावी, थकलेले पगार  द्यावेत, मृतदेह उचलण्यासाठी वॉर्डबॉयची तसेच स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. तिसऱ्या लाटेची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

– जगदीश पवार (नगरसेवक)