“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी अमित शाह यांच्या वरील विधानाचाही समाचार घेतला.

दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना, त्यांनी, बॉम्बे नको मुंबई हवी, अशी मागणी झाली, तेव्हा मीदेखील ही मागणी करणाऱ्यांमध्ये होतो, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी अमित शाह यांच्या वरील विधानाचाही समाचार घेतला, बॉम्बेचं मुंबई करण्यात अमित शाहांचं योगदान असेल, तर आम्ही काय त्यावेळी गोट्या खेळत होतो का? अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“बॉम्बेचं मुंबईत करण्यात माझं योगदान आहे, असं अमित शाह म्हणत असतील, तर मग आम्ही काय त्यावेळी गोट्या खेळत होतो का? बॉम्बेचं मुंबई व्हावं, मुंबईतील दुकांनांवरील पाट्या मराठीत व्हाव्या, यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही मोठं आंदोलन केलं होतं. राम नाईक, पीबी सांमत यासारख्या नेत्यांनी हा विषय न्यायालयात नेला होता. त्यावेळी लढ्यात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले होते. मात्र, तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचं मुंबई मी केलं म्हणून सांगता आणि यावरून भाजपाचे लोक मुर्खासारखे टाळ्या वाजवतात, हे सगळंच हास्यास्पद आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे वाचले का?  ‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत

“आजही असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आहे”

“१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईत निर्माण झाली आहे. हे हुतात्मे मराठीत होते. यापुढे जेव्हा मुंबईवर हल्ला होईल, तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि असली शिवसेनेत आहेत, हे अमित शाह यांनी लक्षात ठेवावं”, असंही संजय राऊत म्हणाले.

अजित पवार यांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. अजित पवार यांनी काल बारामतीतून निवडणूक न लढण्यासंदर्भात एक विधान केलं होतं, यासंदर्भात बोलताना, “अजित पवार हे बारामतीतून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे. त्यांनाही याची कल्पना आली आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची विधानं करत आहेत. त्यांच्यावर आता काय बोलू? शरद पवार हे त्यांना वडिलांसारखे आहेत, ज्यांनी सर्व काही दिलं, त्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला. आता पश्चात्ताप करुन काय उपयोग”, असं संजय राऊत म्हणाले.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले