भविष्यात देशात पाण्याच्या भीषण टंचाईची शक्यता

सध्या देशात भरपूर पाऊस पडत असला तरी भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची चिन्हे  आहेत.

निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांचे मत

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सध्या देशात भरपूर पाऊस पडत असला तरी भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची चिन्हे  आहेत. संपूर्ण भारतात पाण्याची कमतरता ही मोठी समस्या भेडसावणार आहे. याचा सर्वानीच गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांनी मांडले.

रोटरी क्लब नाशिक आणि रोटरी एन्क्लेव यांच्या सहकार्याने डॉ. राजीव कुमार यांचे ‘शाश्वत विकासाकडे भारताची वाटचाल, पुढील पाच वर्षांत भारतात काय बदल बघायला मिळतील, कशा पद्धतीने विकासाच्या योजना राबविण्यात येतील’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. करोनाच्या पाश्र्वभूमीवर हे व्याख्यान ऑनलाईन पध्दतीने पार पडले. केंद्र सरकारने आजपर्यंत केलेल्या विकास कामांचा वेग पाहता, यापूर्वीच्या सरकारपेक्षा मोदी सरकारचा वेग हा अधिक असल्याकडे डॉ. राजीव कु मार यांनी लक्ष वेधले. नीती आयोगाच्या सहकार्याने समाजाच्या विकासासाठी विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा विचार आहे. यामुळे भारताचा विकास दर वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. औद्योगिकीकरण, शेतीविषयक धोरण, आयात-निर्यात, सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहचतील, यासाठी एक नागरिक म्हणून प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. सेंद्रिय कृषी उत्पादन कसे वाढेल यावर भर देतानाच अल्पभूधारक शेतकऱ्यांना करार शेती पध्दतीच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मत त्यांनी मांडले. कृषी मालाची निर्यात कशी वाढवता येईल, यावरदेखील नीती आयोग काम करीत आहे. नीती आयोगाने सध्या नैसर्गिक शेतीवर लक्ष केंद्रित केले असून, सेंद्रिय शेती उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांसाठी जे संशोधन केले जाते, यासाठी उद्योजकांनी हातभार लावायला हवा असे ते म्हणाले.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

या कार्यक्रमात नाशिकसह देशातील विविध भागातून नागरिक सहभागी झाले होते. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी प्रास्ताविक केले. सचिव विजय दिनानी आणि प्रफु ल बरडीया यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन ब्रह्मा आणि सुजाता राजेगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.