भारताची चिंता वाढवणारी बातमी; चाचणीमध्ये अत्याधुनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झालं Fail

ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती, मात्र अपेक्षित लक्ष्य गाठण्याआधीच हे क्षेपणास्त्र खाली पडल्याची माहिती सुत्रांनी दिली

भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं. ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनची चाचणी घेतली जात होती. यामध्ये ४५० किमी दूरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला जो अपयशी ठरला.

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

“क्षेपणास्त्र डागल्यानंतर अवघ्या काही काळामध्येच ते पडलं. सोमवारी सकाळी ही चाचणी करण्यात आली. हे असं का घडलं या मागील कारणांचा तपास डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) वैज्ञानिक आणि ब्रम्होस अरोस्पेस कॉर्परेशनच्या टीम्सकडून केला जाणार आहे,” अशी माहिती सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियाने मिळून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. चाचणीदरम्यान हे क्षेपणास्त्र फारच कमी वेळा अपयशी ठरलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार लॉन्चिंगच्या वेळी झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे चाचणी अपयशी ठरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र नक्की काय गोंधळ झाला हे संपूर्ण तपासणी केल्यानंतर स्पष्ट होईल असं सुत्रांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई एसयू- ३० एमकेआय या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल. चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केलं होतं. भारतामधील ब्रम्हपुत्रा आणि रशियामधील मोस्कव्ह या नद्यांच्या नावांवरुन या क्षेपणास्त्राचं नाव ठेवण्यात आलं आहे.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?