‘भारताला रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न’; चोख प्रत्युत्तर देण्याचा राजनाथ सिंह यांचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.

पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत. हजारो वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचा पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आमच्या देशाच्या अखंडता आणि एकतेला तोडण्याचा प्रयत्न झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिला.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री दोन दिवसांच्या या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आले आहेत. बारामुल्ला येथे सुरक्षा दलांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. ‘‘आपले शेजारी राष्ट्र नेहमीच भारतविरोधी कारवाया करत आहेत. या देशालाही दहशतवादाची झळ बसली असूनही भारतातील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार केले जात आहेत. भारताचे अखंडत्व आणि एकता यांच्यावर वार करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत. मात्र असे प्रयत्न झाल्यास भारतील सैन्यदलाकडून योग्य आणि चोख प्रत्युत्तर देण्यात येईल,’’ असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

जम्मू-काश्मीरमध्ये आधी मोठय़ा प्रमाणात दहशतवादी हल्ले व्हायचे. मात्र सैन्य दल, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या अथक प्रयत्नांमुळे सध्या दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. आपले सुरक्षा दलाने देशासाठी मजबूत सुरक्षा कवच तयार केले आहे, जो कोणी ते तोडण्याचा प्रयत्न करतो, तो स्वत:ला रक्तबंबाळ करतो. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपले सैन्यदल तत्पर असून आपल्या सैन्यावर राष्ट्राचा अपार विश्वास आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्र्यांनी सैन्य दलाचे कौतुक केले.

हे वाचले का?  आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या अडचणी वाढल्या, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल