भारतीय पुरुष, महिला फुटबॉल संघांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता; आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यापूर्वी सांघिक गटासाठी आशियात पहिल्या आठमध्ये असणाऱ्या संघांनाच प्रवेश देण्याचा नियम केला होता.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागासाठी सांघिक क्रीडा प्रकारांसाठीचे असलेले पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतल्यामुळे आता भारतीय पुरुष, महिला फुटबॉल संघाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यापूर्वी सांघिक गटासाठी आशियात पहिल्या आठमध्ये असणाऱ्या संघांनाच प्रवेश देण्याचा नियम केला होता. त्यामुळे भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघ आशियाई स्पर्धेसाठी अपात्र ठरत होते. त्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने क्रीडा मंत्रालयाला फुटबॉल संघास सहभागाची मान्यता देण्याची विनंती केली होती. संघ प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून चार वर्षे खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल असे सांगून यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती.

हे वाचले का?  Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

या सगळय़ा पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी ‘ट्वीट’ करून भारतीय फुटबॉल संघाला आशियाई स्पर्धेच्या सहभागासाठी मान्यता देण्यात आल्याचे जाहीर केले. भारतीय संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी लक्षात घेऊन नियम शिथिल करून त्यांना मान्यता देण्यात आली आहे. भारतीय संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केली.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

चार संघांना परवानगी नाकारली

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने बुधवारी भारताच्या महिला सॉफ्टबॉल, पुरुषांचा वॉटरपोलो, पुरुष हॅण्डबॉल आणि बास्केटबॉल या चार संघांना परवानगी नाकारली. त्याचवेळी अन्य १५ संघांना मान्यता दिली.