भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्या? रेल्वे मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

करोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द?

करोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढत असताना देशभरात अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात सोशल मीडियावर भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्याचं वृत्त वेगाने पसरतंय. त्यावर अखेर रेल्वे मंत्रालयाकडून निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याचं वृत्त तथ्यांवर आधारित नसल्याचं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सोमवारी रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे, “सोशल मीडियामध्ये व्हायरल होणारं वृत्त दिशाभूल करणारं असून तथ्यांवर आधारित नाहीये. सोशल मीडियामध्ये चुकीच्या न्यूज क्लिप प्रसारित केल्या जात आहेत. व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून चुकीच्या संदर्भासह तो व्हायरल होत आहे”, असं स्पष्टीकरण देण्यात आलं.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

याशिवाय, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेनेही स्पष्टीकरण दिलं आहे. “ट्रेन रद्द केल्याचं वृत्त जुनं आहे, भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. जुनी बातमी चुकीच्या संदर्भासह शेअर केली जात आहे”, असं पीआयबीकडूनही स्पष्ट करण्यात आलं आहे.

त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द केल्याचं वृत्त खोटं असून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही हे स्पष्ट झालं आहे.