भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

S Jaishankar meets Mohammad Ishaq Dar : मागील १७ वर्षांमध्ये भारतीय संघ एकदाही पाकिस्तानला गेलेला नाही.


S Jaishankar meets Mohammad Ishaq Dar India Pakistan Cricket window : पाकिस्तानमध्ये आयोजित शांघाय सहकार्य परिषदेसाठी (एससीओ समिट) भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं. अनेक वर्षांनंतर भारतीय नेते शेजारील देशात आयोजित एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेले होते. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया होत असताना पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका भारतानं घेतली आहे. पण असं असलं, तरी नुकतीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मोजून २० सेकंदांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्याशी भेट झाली. आता त्यांच्यात तेवढ्या वेळात काय बोलणं झालं असेल, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

दरम्यान, एस. जयशंकर यांच्या या दौऱ्यावेळी एका पाकिस्तानी नेत्याने त्यांची भेट घेऊन क्रिकेटच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचे दावे काही प्रसारमाध्यमांनी केले आहेत. पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डची इच्छा आहे की भारताने या स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवावा. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या तरी त्यास अनुकूल नाही. भारताने याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नसला तरी पाकिस्तान भारतीय संघाच्या वाटेकडे डोळे लावून बसला आहे. भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यास ही स्पर्धा कदाचित पाकिस्तानबाहेर खेळवली जाऊ शकते.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर

दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये का चर्चा झाली?

मागील १७ वर्षांमध्ये भारतीय संघ एकदाही पाकिस्तानला गेलेला नाही. मात्र, भारताने आता पाकिस्तानला आपला संघ पाठवून उभय देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पहिलं पाऊल टाकावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी नेत्याशी या विषयावर बातचीत केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार व एस. जयशंकर यांची २४ तासांत दोन वेळा भेट झाली. या भेटींमध्ये क्रिकेटवर सर्वाधिक चर्चा झाली. दोघांनाही क्रिकेट खूप आवडतं. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांच्या प्राथमिक स्तरावरील बातचीत झाली असावी. यावरून कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

बीसीसीआयचा पाकिस्तानला हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये म्हणजेच पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. बीसीसीआय पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळेच बीसीसीआयने आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. भारताचे सामने पाकिस्तानबाहेर व उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जावेत असा सल्ला भारताने पाकिस्तानला दिला असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचले का?  पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गुप्त भुयार? पुरातत्त्व खात्याकडून होणार पडताळणी..