मंजुल भारव्दाज यांना कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाचा पुरस्कार जाहीर

तीन जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयात भारद्वाज यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार नाट्य दिग्दर्शक तथा रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांना जाहीर झाला आहे. तीन जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयात भारद्वाज यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आणि प्रेरणा पुरस्कार दिला जातो. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी कॉ. गोविंद पानसरे, डॉ. गेल ऑम्वेट, डॉ. रूपाताई बोधी-कुलकर्णी, उषा वाघ, शांता रानडे, मेहरूनिसा दलवाई, डॉ. यशवंत सुमंत, डॉ. तसनीम पटेल, सुकन्या मारूती, आमदार जीवा पांडू गावीत, प्रा. सुनीलकुमार लवटे, सुभाष वारे आणि मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे १८ वे वर्षे आहे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

या वर्षीच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कारासाठी कला केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समग्र परिवर्तनाचेही एक महत्वाचे साधन असल्याचा सिध्दांत घेवून आणि तो कृतिशील करून गेल्या तीस वर्षापासून नाटय क्षेत्रात कार्यरत असलेले दिग्दर्शक आणि रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये १० हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल असे आहे.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

तसेच या वर्षीच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कारासाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आरोग्य आणि विद्यार्थी चळवळीत कार्य करणारे स्वानंद जोशी, रविकांत शार्दूल, जिवाजी वाघमारे, डॉ. ॲग्नेस जॉन खरात आणि विराज देवांग यांची निवड करण्ययात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि शाल असे आहे.