ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल – संजय राऊत

“चार राज्यांच्या निवडणुका देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार”

देशातील चार राज्यांच्या निवडणुका या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार असल्याचं शिवेसना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात ३०, तर आसाममध्ये ३९ जागांसाठी मतदान होत आहे.

“पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत. खासकरुन पश्चिम बंगाल आणि आसाम….केरळ आणि तामिळनाडूत काय होईल याचा अंदाज आपण मांडू शकतो. पण आसाममध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपाचं राज्य असलं तरी काँग्रेस तगडी फाईट देत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हे वाचले का?  Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

पुढे ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे या निकालांनंतरच देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे आणि विरोधी पक्षांच्या आघाड्या स्थापन होऊन ते कोणती भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल”. संजय राऊत यांनी यावेळी ममता बॅनर्जी सहज विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी नेत्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की, “या देशात नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, ही पहिली वेळ नाही. याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करु. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरु केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल”.

हे वाचले का?  Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

“लॉकडाउन किंवा करोनाचं राजकारण करु नये. मुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री जनतेच्या हिताचं सांगत आहेत. सगळ्या विरोधी पक्षाच्या घटकपक्षांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे,” असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.

लॉकडाउन हा उपाय नाही या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की, “हे आम्हालाही माहिती आहे, यात नवीन काय आहे. मोदींनापण हे माहिती आहे, तरी एक वर्ष लॉकडाउन केला होता. ही गरज आहे…मोदींनी काय प्रेमाने, आनंदाने लॉकडाउन केला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील कठोर निर्बंध लावू इच्छित आहे, ती काही त्यांच्यासाठी आनंदाची बाब नाही. पण काय करणार?”

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?